कऱ्हाडच्या पतसंस्थेला पावणेतीन कोटीचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यासह मुलीला अटक
By शीतल पाटील | Published: July 4, 2023 09:05 PM2023-07-04T21:05:20+5:302023-07-04T21:05:27+5:30
‘जनकल्याण प्रकरण’ : पाच दिवस कोठडी
मिरज : जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करुन कराड येथील जनकल्याण पतसंस्थेला तब्बल दोन कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार सुनिल गणेश परांजपे (वय ५५), पत्नी सुचिता सुनिल परांजपे (५०), मुलगी पूर्वा सुनिल परांजपे ( २५, रा. खरे हाैसिंग सोसायटी सांगली) या तिघांना गांधी चाैक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांनाही शनिवारपर्यत पोलिस कोठडी दिली आहे.
सुनिल परांजपे, सुचेता परांजपे व पुर्वा परांजपे या तिघांनी महावीर हुळ्ळे याच्याशी संगनमत करुन जनकल्याण पतसंस्थेला मिरजेत सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे जमीन असल्याचे खोटे सांगून पंढरपूर रस्त्यावरील जमिनीची बनावट कागदपत्रे सादर केली. या जमिनीवर पावणेतीन कोटी रुपये कर्ज उचलले. संबंधीतांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित कर्जदार तारण ठेवलेल्या जमिनीचे मूळ मालक नसल्याचे आढळले. सुनिल परांजपे याच्या विश्रामबाग येथील जमिनीवर ७५ लाख रुपये कर्जाचा बोजा चढविला असताना दिव्या आहुजा, प्रियदर्शनी वाघ, सच्चानंद आहुजा, महेश ओझा, सचिन दणाणे, आण्णासो चौगुले व सीमा परमार यांनी या मिळकतीची बेकायदा खरेदी व साठेखत केल्याचे आढळले.
त्यामुळे संबंधीतांनी बोगस जमीनीचे बनावट कागदपत्रे सादर करुन जनकल्याण पतसंस्थेला दोन कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे लक्षात येताच पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कृष्णराव फडके यांनी ॲड. बिल्किस शेख यांच्यामार्फत मिरज न्यायालयात फसवणुकीची फिर्याद दिली. न्यायालयाच्या आदेशाने चार महिन्यापूर्वी महात्मा गांधी चौक पोलिसात सुनिल गणेश परांजपे त्याची पत्नी सुचेता सुनिल परांजपे, मुलगी पुर्वा सुनिल परांजपे, महावीर बाबासो हुळ्ळे यांच्यासह कर्जबोजा असलेली मिळकत विकत घेणार्या दिव्या रमेश आहुजा, प्रियदर्शनी अभिषेक वाघ, सच्चानंद मोहनलाल आहुजा, सचिन आण्णासाहेब दणाणे, आण्णासा चौगुले, सीमा गिरीश परमार व उत्तम लक्ष्मण पाटील अशा १२ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यांत आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनिल परांजपे व त्याच्या कुटुंबियांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी परांजपे दांपत्यासह मुलीस पुण्यातून अटक केली. परांजपे याचा साथीदार महावीर हुळ्ळे यास न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामिन दिला आहे.