भाटशिरगावला तलावात बुडून दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:23+5:302021-02-18T04:50:23+5:30

२)सुमन देसाई लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे मासे पकडण्यासाठी गेले असताना पाय ...

The couple drowned in Bhatshirgaon lake | भाटशिरगावला तलावात बुडून दाम्पत्याचा मृत्यू

भाटशिरगावला तलावात बुडून दाम्पत्याचा मृत्यू

Next

२)सुमन देसाई

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे मासे पकडण्यासाठी गेले असताना पाय घसरून पाझर तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्यादरम्यान घडली. अर्जुन लक्ष्मण देसाई (वय ५५) व सुमन अर्जुन देसाई (४५) अशी मृतांची नावे आहेत. तलावात जवळपास चार तास शोध घेतल्यानंतर सायंकाळी दोघाचे मृतदेह सापडले.

भाटशिरगाव येथील पाझर तलावाजवळच देसाई कुटुंबीय राहतात. बुधवारी दुपारी अडीचच्यादरम्यान अर्जुन व सुमन मासे पकडण्यासाठी तलावात गेले होते. यावेळी मासे पकडण्याचे जाळे बाहेर ओढत असताना सुमन यांचा पाय घसरला व त्या पाण्यात पडल्या. ही घटना पाहून त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती अर्जुन यांनी पाण्यात उडी मारली. अर्जुन यांना पोहता येत होते; मात्र सुमन यांना पोहता येत नव्हते. अर्जुन हे सुमन यांना वाचविण्याचा प्रयत्न करत होते; मात्र सुमन यांनी अर्जुन यांना मिठी मारून पकडले. यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.

ही घटना तलावाशेजारी उभा असलेला सातवर्षीय नातू साकेत याने पाहिली. त्याची आई धनश्री शेतात पाणी पाजत होत्या. साकेतने त्यांना ही घटना सांगितली. यानंतर धनश्री यांनी तलावाकडे धाव घेत गावातील नागरिकांनाही गोळा केले.

नागरिकांनी शोधाशोध केल्यानंतर शिराळा पोलिसातही याबाबत वर्दी देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिकांनी तलावात दोघांचाही शोध घेतला. सायंकाळी साडेसहाच्यादरम्यान एका झुडपालगत दोघांचे मृतदेह आढळून आले. दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

या घटनेची वर्दी पोलीसपाटील सचिन गुरव यांनी दिली असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत. मृत अर्जुन व सुमन यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे.

चाैकट

जमीन अन् आयुष्य दोन्ही संपले

देसाई कुटुंबाची या तलावाशेजारीच वस्ती आहे. या तलावासाठी त्यांची जमीनही गेली आहे. अर्जुन हे अगोदर रोडरोलरवर चालकाचे काम करीत होते. पाझर तलावाची जमीनही गेली व आज आयुष्यही संपले. याची चर्चा करत नागरिक दुःख व्यक्त करीत होते.

Web Title: The couple drowned in Bhatshirgaon lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.