जमिनीच्या वादातून चुलत भावाकडून भावाचा खून, आरोपी अटकेत; सांगलीतील बेडगमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:48 AM2023-06-20T11:48:13+5:302023-06-20T11:48:35+5:30
खुनाच्या घटनेने सांगली जिल्हा हादरुन गेला
सांगली : बेडग (ता. मिरज) येथे बंडू शंकर खरात (वय ५०) या शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी (दि. १९) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. खुनानंतर संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती येथे घटना घडली. जमिनीच्या वादातून खून झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर घाव घालण्यात आले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना प्रतिकाराची संधीही संशयिताने दिली नाही. सपासप वार करून खून करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. खुनासाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली.
खरात यांचा जमिनीच्या वादातून एकाशी वाद सुरू होता. सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला. त्याचे पर्यवसान खुनामध्ये झाले.
मृत खरात यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात रात्री नेण्यात आला. घटनास्थळी मिरज ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. चव्हाण हजर झाले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व अन्य प्रक्रिया सुरू होती.
गावात महिन्यात दुसरा खून
बेडगमध्ये एकापाठोपाठ एक खुनाचे प्रकार घडत आहेत. एका महिन्यातच आजचा दुसरा असा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारल्याची घटना नुकतीच घडली होती.