शेटफळेत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:56+5:302021-04-28T04:29:56+5:30
करगणी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावामध्ये शेटफळे ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्राच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर ...
करगणी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावामध्ये शेटफळे ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्राच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिल्या आहेत. यासाठी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्य लाभणार आहे. कोरोना केअर सेंटर सुरू होत असल्याने सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांना दिलासा देणारी बाब आहे.
शेटफळेत गेल्या महिन्याभरापासून कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन मुळीक व नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेत ज्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे, अशा लोकांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांना आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल व शेटफळे गर्ल्स हायस्कूल येथे ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यांच्यावर आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहे. ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येईल अशा एकाही रुग्णाला घरात न ठेवता थेट कोरोना केअर सेंटरला ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ज्या संशयित रुग्णाचे नमुने तपासनीस दिले आहेत, त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत कॉरण्टाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय ज्या परिसरात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, अशा ठिकाणी मिनी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार असून, तो परिसर बंद करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिक सहकार्य करत नसल्यास आशा नागरिकांची नावे पोलीस ठाण्यात कळवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.