सांगलीत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:15+5:302021-05-06T04:27:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत १०० बेडचे स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. सांगली-मिरज रोडवरील श्री राधास्वामी सत्संग न्यासच्या जागेत सेंटर सुरू झाले आहे. येथे शंभर बेडची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी सामाजिक भान म्हणून संघाने हे कोविड सेंटर सुरू केले आहे. ज्यांची अँटिजेन टेस्ट, आरटीपीसीर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे व कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, अशा रुग्णांसाठी हे कोविड सेंटर आहे. या रुग्णांना दाखल करून घेताना दोन किट देण्यात येणार आहेत. एक औषधाचे किट आणि दुसरे चादर, टूथपेस्ट, ब्रश,पाण्याची बाटली यासह आवश्यक साहित्याचे किट देण्यात येणार आहे.
या ठिकाणी सात डॉक्टरांची एक स्वतंत्र टीम काम करीत आहे. दोनवेळा रुग्णांना आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे. दोनवेळचे चहा, नाष्टा, जेवण आणि राहण्याची मोफत सोय आहे. दररोज प्राणायाम, समुपदेशन करण्यात येणार आहे. १५ स्वयंसेवक या सेंटरवर काम करणार आहेत.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक विलास चौथाई, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे डॉ. राम लाडे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते. आभार जिल्हा कार्यवाह नारायण जोशी यांनी मानले.