नेर्ले येथे गाईच्या ओटीभरणाचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:00+5:302021-02-12T04:24:00+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील कदम वस्तीवर एका अनामिकेच्या ओटीभरणाची लगबग सुरू होती. कोणी साडीचोळी आणली, तर ...
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील कदम वस्तीवर एका अनामिकेच्या ओटीभरणाची लगबग सुरू होती. कोणी साडीचोळी आणली, तर कोणी गोडधोड आणले. सुहासिनीच्या ओटीभरणाला लागणारे सर्व साहित्य या वस्तीवरील मांडवात सजवून ठेवण्यात आले होते. सर्व तयारी झाल्यावर जिचं ओटीभरण करायचे होते, त्या अनामिकेला म्हणजेच पै. जयकर कदम यांच्याकडील देशी गाईला मांडवात आणण्यात आले आणि साग्रसंगीत सोहळा एका नवलाईच्या उत्साहात पार पडला.
भारतीय संस्कृतीमध्ये ओटीभरण या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे झाले मानवी जीवनाच्याबाबतीत. परंतु गाईचा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला, तर तो औत्सुक्याचा, कुतूहलाचा व चर्चेचा विषय होतो. असाच हा गाईचा ओटी भरण्याचा कार्यक्रम शानदारपणे पार पडला.
नेर्ले गावचे माजी सरपंच जयकर कदम व त्यांच्या पत्नी अंजली यांनी आपल्या गाईचा ओटीभरण समारंभ नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत साजरा केला. पैलवान कदम यांनी प्रगतशील शेतकरी म्हणूनही नाव कमावले. भारतीय संस्कृतीमध्ये देशी गाईला गोमाता म्हणून पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र हे औषधी असून, देशी गाय पाळण्याची त्यांची परंपरा आहे. यावेळी नंदा कदम, छाया कदम, दुर्गा मुळे, केदार शिंदे, पांडुरंग कदम, रंभा शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो ओळ- ११०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले न्यूज
नेर्ले (ता. वाळवा) येथे गाईचे ओटीभरण करण्यात आले. यावेळी पै. जयकर कदम, अंजली जयकर कदम, छाया कदम, नंदा कदम आदी उपस्थित होते.