पाण्यापेक्षा गाईचे दूध स्वस्त वाळवा तालुक्यात जादा दर : वेगवेगळ्या भागात दर अस्थिर;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:22 PM2018-05-29T22:22:53+5:302018-05-29T22:22:53+5:30
गेल्या नऊ महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरपासून सांगली जिल्ह्यात गाईच्या दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
अतुल जाधव ।
देवराष्ट्रे : गेल्या नऊ महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरपासून सांगली जिल्ह्यात गाईच्या दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. पाण्यापेक्षा गाईच्या दुधाचे भाव कमी केल्यामुळे व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यातच जिल्ह्यातील दूध संघांनी दूध उत्पादकांना धक्का देत दर कमी करण्याची मालिकाच चालू केली आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गाईच्या दुधाचे दर कमी-जास्त प्रमाणात उत्पादकांना मिळत आहेत. उन्हाळा वाढल्यावर तरी दुधाचे दर वाढतील, अशी आशा दूध उत्पादकांची होती; मात्र प्रंचड प्रमाणात उष्णता वाढूनही दूध दरात कोणतीही भाववाढ न झाल्याने नाराजी होती. त्यातच उष्णता वाढल्यामुळे दूध उत्पादन घटू लागले आहे.
राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ फॅटसाठी २७ रुपयांचा खरेदी दर जुलै २०१७ पासून लागू केला; पण त्याची कार्यवाही न होता तेव्हापासून दरात मोठी घसरण चालू होती. या दराच्या घसरणीने आता नीचांक गाठला आहे. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरीचे पडलेले दर याचे कारण पुढे करीत दर कपात केल्याचे जाहीर केले आहे. खासगी व सहकारी दूध संघांच्या संघटनांनी अनेक मुद्दे पुढे करून दूध दरवाढ कमी केली आहे; पण उन्हाळा वाढत चालला तरी दरवाढ करण्यासाठी शासन व संघस्तरावर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत.
दूध उत्पादकांची चिंता वाढली
आर्थिक कोंडीत सापडलेल्या दूध उत्पादकांना यातून बाहेर काढण्यासाठी शासन व संघांनी दरवाढ करावी, अशी मागणी होत असताना, पुन्हा दर कमी केल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांच्या दूध व्यवसायावर मंदीचे ढग निर्माण झाले असताना, कोणताही राजकीय नेता दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात गाईच्या दुधाचे सध्याचे दर प्रतिलिटर २५ रुपयांच्या घरात असताना, सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील दर प्रतिलिटर १७ ते २३ रुपयांच्या घरात आहेत.
वाळवा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजेच ३.५ फॅटला २३ रुपये दर मिळत आहे. बाकीच्या तालुक्यात कमी दराने दूध खरेदी केली जात आहे.
कोल्हापूरपेक्षा सांगलीत : दर कमी