शासकीय आरोग्य व्यवस्थेचा ‘जयंत पॅटर्न’ निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:16+5:302021-05-24T04:26:16+5:30
विटा : कोरोनाच्या प्रचंड महामारीत सर्वसामान्य जनतेला जगण्याची शाश्वती देईल अशी आरोग्याची शासकीय व्यवस्था मजबूत करून या आरोग्य व्यवस्थेतून ...
विटा : कोरोनाच्या प्रचंड महामारीत सर्वसामान्य जनतेला जगण्याची शाश्वती देईल अशी आरोग्याची शासकीय व्यवस्था मजबूत करून या आरोग्य व्यवस्थेतून उच्चदर्जाचा ‘जयंत आरोग्य पॅटर्न’ निर्माण करावा, असे साकडे खानापूर पंचायत समितीच्या सदस्या सौ. कविता सुशांत देवकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना घातले.
सांगली येथे मंत्री पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. या निवेदनात कोरोना महामारीत आरोग्याच्या शासकीय तसेच खासगी व्यवस्था सर्वत्र अपुऱ्या पडल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांची भिस्त शासकीय आरोग्य व्यवस्थेवरच असल्याने तेथील साधनसामग्री, औषधे, मशिनरी, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या अवस्थेने सर्वसामान्यांचे जगणे रामभरोसे ठरले आहे. पहिल्या लाटेनंतर युद्धपातळीवरून लसीकरण न झाल्याचे परिस्थती आणखी गंभीर झाली आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य शासनाने आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे.
प्रत्येक तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये अन्य शासकीय आरोग्य व्यवस्था अत्यावश्यक सर्व औषधे, यंत्रसामग्री, ऑक्सिजनयुक्त व्हेंटिलेटर बेड, पुरेसा अधिकारी कर्मचारी वर्ग, मोठ्या रुग्णसंख्येला पुरेसा पडण्यासाठी ऑक्सिजन प्लांट, तालुका स्तरावरील शासकीय व्यवस्थांमध्येच ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरयुक्त किमान ४०० बेडची व्यवस्था उभी करावी. तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका पाहता त्याच्या मातेला रुग्णालयात राहण्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे. प्रत्येक तालुकास्तरावर किमान चार रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाव्यात. मतदान बुथनिहाय लसीकरण केंद्रे करावीत, आदी मागण्याही त्यांनी केल्या.