प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार करा : डॉ. अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:34 PM2019-12-17T14:34:09+5:302019-12-17T14:50:39+5:30
प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
सांगली : आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याकामी जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूर (व्हाईट आर्मी, कोल्हापूर) यांच्या प्रशिक्षकांमार्फत पूरप्रवण गावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षण घेतेलेल्या युवकांमधून गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात पूरप्रवण गावातील सर्वांनी सहभागी व्हावे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
पंचायत समिती पलूस येथील सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्व तयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, पंचायत समिती सभापती सिमाताई मांगलेकर, उपसभापती अरूण पवार, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पूरप्रवण गावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या माध्यमातून गाव आपत्ती व्यवस्थापन दल तयार करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात सर्व लोकांनी, तरूण मंडळे, गणेश मंडळे यांनी सहभागी व्हावे. आपत्तीमध्ये पहिला प्रतिसाद गावातील लोकांचा असतो. तो अत्यंत चांगल्या प्रकारे मिळाला तर पुढे अडचण येत नाही. यासाठी लोकांना नेमके काय करावयाचे आहे हे माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी समन्वय ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचे (15-20) गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक दलाला पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा असणे आवश्यक आहे.
यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागली तर काय करावे, नागरिक, पशु यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी उंचावरची ठिकाणे शोधणे आदि विविध बाबींचा या आपत्ती व्यवस्थापन आरखड्यामध्ये समावेश असणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन ही निरंतर प्रक्रिया असून सर्वांनी एकोप्याने काम करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोटी देण्याबरोबरच आपत्तीच्या काळात उपयुक्त असणारे दोरखंड, सर्च लाईट आदि साहित्यांचे किट तयार करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ज्या ग्रामपंचायतींना बोटी देण्यात आल्या आहेत त्या दुरूस्त करून घ्याव्यात व त्यांची निरंतर देखभाल ठेवावी. ही ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, तहसिलदार राजेंद्र पोळ व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी महापूरात आलेल्या त्यांना आलेल्या अडचणी मांडल्या. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी अशा बाबींचा गाव आपत्ती व्यपस्थापन आराखड्यात समावेश करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीचा हेतू विशद करून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी मानले.
यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, पूरप्रवण गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आदि उपस्थित होते.