क्रिकेट लीग स्पर्धा बारावी परिक्षेनंतर घ्याव्यात, पालकांची मागणी; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला निवेदन
By अविनाश कोळी | Published: January 7, 2024 02:48 PM2024-01-07T14:48:42+5:302024-01-07T14:50:35+5:30
नागरिक जागृती मंचनेही पालकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठविले आहे.
सांगली : सध्या महाराष्ट्रात १९ वर्षाखालील क्रिकेट निवड चाचणी चालू झाली आहे. लवकरच लीग सामने सुरु होतील. या वयोगटातील बहुतांश मुले ही बारावीला आहेत. बारावीची परीक्षा जवळ आल्याने अनेकांची कुवत व इच्छा असूनही त्यात भाग घेता येत नाही. त्यामुळे बारावी परीक्षेनंतरच या स्पर्धा घ्याव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे.
नागरिक जागृती मंचनेही पालकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, डिसेंबर अखेरीस १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटसाठी २१ जिल्हे व पुण्यातील क्लब अशा क्रिकेट संघाच्या निवड चाचणीची घोषणा केली. त्यासाठी संघ निवड चाचणी चालू आहे व बऱ्याच जिल्ह्यात घेतली गेली आहे.
प्रामुख्याने १९ वर्षाखालील बहुतांश पात्र ठरु शकणारे खेळाडू १२ वीमध्ये शिकत असतात. त्यांच्या दृष्टीने हे शैक्षणिक वर्ष अतिशय महत्वाचे आणि भविष्यातील दिशादर्शक असते आणि त्यासाठीच शासना कडून बोर्ड परीक्षा घेतली जाते. त्यांच्या बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारीपासून चालू होणार आहेत. त्यामुळे मुलांवर अभ्यासाचा खूप ताण असतो. अभ्यास, परीक्षा की क्रिकेट अशी द्विधा मनस्थिती या मुलांची झाली आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्रामधील सर्वच पालकांकडून आणि १९ वर्षाखालील मुलांकडून आगामी लीग व सुपर लीग सामने बारावी परीक्षा संपल्यानंतर घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.