शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांविरुध्द गुन्हा

By admin | Published: April 1, 2016 01:22 AM2016-04-01T01:22:14+5:302016-04-01T01:32:27+5:30

जातीवाचक शिवीगाळ : तरुणास मारहाण; घर, जागा, गाळे बळकावण्याचा प्रयत्न

Crime against Shiv Sena's district chief | शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांविरुध्द गुन्हा

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांविरुध्द गुन्हा

Next

इस्लामपूर : शहरातील ताकारी रस्त्यावरील हरिजन को-आॅप-सोसायटीमधील शंकर ज्ञानू महापुरे यांच्या मालकीच्या जागेवर कब्जा करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्यासह इतरांविरुध्द दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शंकर ज्ञानू महापुरे (वय १८, रा. उरुण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आनंदराव रामचंद्र पवार, उमेश रामचंद्र पवार, सुहास संजय पाटील इतर तिघांविरुध्द गुन्हा नोंदवला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर महापुरे यांची हरिजन सोसायटीत घर जागा मिळकत आहे. तेथे रस्त्याच्या बाजूला त्यांनी दोन गाळे बांधले आहेत. त्यापाठीमागे घर आणि मोकळी जागा आहे.
फिर्यादी महापुरे व आनंदराव पवार हे वर्गमित्र आहेत. २६ आॅगस्ट २०१४ रोजी पवार यांनी गाळे वापरण्यास परवानगी मागितली. वर्ग मित्र म्हणून महापुरे यांनी हे गाळे वापरण्यास दिले, मात्र तेथे उमेश पवार आणि त्याच्या मित्रांकडून गैरवर्तन होऊ लागले. त्याला महापुरे यांनी हरकत घेऊन गाळे रिकामे करण्यास सांगितले. त्यानंतर पवार हे गाळे सोडतील, अशी महापुरे यांची आशा होती.
मात्र त्यानंतर या गाळ्यावरुन वाद वाढत गेला. महापुरे यांनी २८ मार्च रोजी दोन्ही गाळ्यांना स्वत:ची कुलपे लावली. ३० मार्चच्या सकाळी साडेआठ वाजता उमेश पवार आणि सुहास पाटील हे शंकर महापुरे यांच्या घरासमोर गेले. तेथे दोघांनी महापुरे यांना गाळ्याला कुलपे का लावलीस हे घर, गाळे आमचे आहेत. तू इथे यायचे नाहीस, असे धमकावले. त्यानंतर पाठोपाठ आनंदराव पवार हे ५ ते ६ जणांना घेऊन आले. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. सुहास पाटील याने लाथ मारली, तर उमेश पवार याने कुटुंबाला जाळून मारण्याची धमकी दिल्याचे महापुरे यांनी फिर्यादित म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Crime against Shiv Sena's district chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.