तुंगमध्ये रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरू ठेवणाऱ्या तीन मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:06 PM2023-09-29T20:06:04+5:302023-09-29T20:06:44+5:30
सार्वजनिक मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली आहे.
- शरद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तुंग (ता. मिरज) येथे गणेशोत्सव मंडळांना विसर्जन मिरवणुकीची दिलेल्या वेळ मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी तीन गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. मध्यरात्री साडेबारापर्यंत या मिरवणूका सुरू राहील्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल झालेल्यांत संत रोहिदास शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष चिन्मय हंकारे, शिवाजीनगर राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल गुरव आणि शिवक्रांती मित्रमंडळाचे अध्यक्ष वैभव कुंभोजे (सर्व रा. तुंंग) यांचा समावेश आहे.
सार्वजनिक मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली आहे. त्यानुसारच विसर्जन करण्याच्या सूचनाही आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे.
तुंग येथेही आयोजित विसर्जन मिरवणुकीत हनुमान मंदिर ते बागडी गल्ली कॉर्नर परिसरात ही घटना घडली. सवाद्य निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कारवाई करण्यात आली.