मिरजेत अपेक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरसह तिघांवर गुन्हा ; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:27+5:302021-06-11T04:19:27+5:30
मिरज : मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरसह तिघांवर गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मिरज : मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरसह तिघांवर गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. महेश जाधव यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला असून, अन्य दोघा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलमधील उपचाराबाबत रुग्णांच्या तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने रुग्ण दाखल करून घेण्यास प्रतिबंध केला; मात्र आदेशाचे उल्लंघन करून नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल करून घेतले होते, तसेच जादा बिल आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी डॉ. महेश भीमसेन जाधव (वय ३६), रुग्णालयात काम करणारे प्रसन्न चंद्रकांत कारंजकर (वय ३६) व नरेंद्र बाळासाहेब जाधव या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रसन्न करंजकर व नरेंद्र जाधव यांना अटक केली आहे. डॉ. महेश जाधव यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. या प्रकरणाच्या चाैकशीत आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.