मिरजेत बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:07+5:302021-09-08T04:33:07+5:30
मिरज : अल्पवयीन वधू-वरांचा विवाह केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मालेगावचे ग्रामविकास अधिकारी ...
मिरज : अल्पवयीन वधू-वरांचा विवाह केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मालेगावचे ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी मुलीचे आई-वडील व मुलाच्या आईविरुद्ध फिर्याद दिली आहे.
मालगाव ग्रामपंचायत हद्दीत सुभाषनगरमध्ये एक अल्पवयीन दांपत्य वास्तव्य करीत असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी सुनील कोरे यांना मिळाली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन दांपत्यास ताब्यात घेतले. लॉकडाऊन काळात त्यांचा विवाह करण्यात आला असून, १७ वर्षांचा वर कापशी वडगाव (ता. कागल) येथील रहिवाशी आहे. १५ वर्षांची वधू शिरदवाड (ता. हातकणंगले) आहे. ही दोन्ही मुले अल्पवयीन असतानाही त्यांचा विवाह कापशी वडगाव येथे करण्यात आला होता. हे अल्पवयीन दांपत्य सध्या सुभाषनगर येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांचा जबाब नोंदविला. या प्रकरणी मुलाची आई शोभा अनिल कांबळे, मुलीची आई अर्चना बाळू कांबळे, वडील बाळू यशवंत कांबळे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.