जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीतही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:37+5:302021-06-06T04:20:37+5:30
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग तितका कमी आला नसला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे ...
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग तितका कमी आला नसला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मात्र घटले आहे. कडक निर्बंध लागू केल्यापासून पोलिसांनी सुरू केलेल्या कडक कारवाईमुळे फाळकूटदादांची दादागिरी व छोट्या मोठ्या चाेरीच्या घटना घटल्या आहेत. आता निर्बंध शिथिल होणार असून त्यानंतर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याने ७ मेपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या कालावधीतही रुग्णसंख्या कायम असल्याने प्रशासनाने आतापर्यंत चारवेळा लॉकडाऊनमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत गुन्ह्यांची संख्या मात्र कमालीची घटली आहे.
लाॅकडाऊन अगोदर शहरातील चारही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी असे. आता हे चित्र दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनतेला निवांतपणा अनुभवास येत असलातरी पोलिसांच्या कामात मात्र वाढ झाली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यासह रस्त्यावर उतरून बंदोबस्तासाठी पोलीस तैनात आहेत.
जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याकडे या महिनाभरात नोंदणी झालेल्या गुन्ह्यांची संख्या तुलनेने कमी आहे. खुनासारख्या घटना कमी झाल्या आहेत. जिल्ह्यात २ घटनांची नोंद झाली आहे. तर या महिन्यात एका घटनेची नोंद आहे. आता कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याने गुन्ह्यांचा टक्का वाढण्याची शक्यता अधिक आहे.
कोट
लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी जाणवत असलेतरी, पोलीस सदैव कर्तव्यावर होतेच. संचारबंदीची अंमलबजावणी, अवैध मद्यविक्रीसह इतर कारवाई करण्यात आल्या.संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत नियम मोडणाऱ्यांकडून दंडाचीही वसुली करण्यात आली आहे.
अजित टिके, पाेलीस उपअधीक्षक