सांगलीत सराफाच्या आत्महत्येप्रकरणी आठजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:29 AM2021-02-11T04:29:32+5:302021-02-11T04:29:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील हरभट रस्त्यावर असलेल्या सराफी दुकानात रविवारी हरिश्चंद्र नारायण खेडेकर (वय ८२, रा. विनायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील हरभट रस्त्यावर असलेल्या सराफी दुकानात रविवारी हरिश्चंद्र नारायण खेडेकर (वय ८२, रा. विनायक चौक, सेना मंदिर रोड, गावभाग, सांगली) या वयाेवृध्द सराफ व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आठ जणांवर शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिश्चंद्र खेडेकर यांनी रविवारी आत्महत्या केली. याप्रकरणी मधुकर कृष्णाजी खेडेकर (७५, रा. गावभाग, नवभारत चौक, सांगली), श्रीकांत ऊर्फ बाळू विष्णुपंत खेडेकर (७०, रा. सिध्दार्थ परिसर, ढवळे तालीम मागे, सांगली), सदानंद विष्णुपंत खेडेकर (६०), प्रकाश विष्णुपंत खेडेकर (५५, दोघे रा. गावभाग, सांभारे गणपतीशेजारी, सांगली), राजू शिरवटकर (५०, रा. नवभारत चौक, गावभाग, जैन बस्तीजवळ, सांगली), वैभव प्रमोद पिराळे (५०, रा. पिराळे ज्वेलर्स, सराफ कट्टा, सांगली), दिवाकर पोतदार (६०, रा. शेडबाळ, ता. कागवाड, जि. बेळगाव), सुनील पंडित (४२, रा. विटा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी खेडेकर यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी खेडेकर यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, झालेली फसवणूक व सावकारीमुळे मानसिक त्रासातून आपण आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. यावरून शहर पोलिसांनी आठ जणांवर, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी तेजस्विनी प्रशांत बेलवलकर (४३, रा. मुंबई) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. यावेळी जबाब देताना एका संशयिताला चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चौकट
आत्महत्येपूर्वी चिठ्ठी
सराफाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच सावकारी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैशाच्या व सोन्याच्या देव-घेवीतून त्रास दिल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.