वाटेगावात बैलगाडी शर्यत घेणाऱ्या आठजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:54+5:302021-09-24T04:31:54+5:30
इस्लामपूर : वाटेगाव (ता. वाळवा) येथील म्हाताऱ्याचा डोंगर परिसरातील माऊली मंदिरासमोरील शेतामध्ये विनापरवाना बैलगाडी शर्यत घेणाऱ्या ८ जणांविरुद्ध कासेगाव ...
इस्लामपूर : वाटेगाव (ता. वाळवा) येथील म्हाताऱ्याचा डोंगर परिसरातील माऊली मंदिरासमोरील शेतामध्ये विनापरवाना बैलगाडी शर्यत घेणाऱ्या ८ जणांविरुद्ध कासेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या गाडी मैदानावरून पोलिसांनी तीन चारचाकी, एक दुचाकी जप्त करून तीन बैल ताब्यात घेतले आहेत.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील आकाराम पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भानुदास वगरे (कासेगाव), शेतमालक सयाजी लोकरे (वाटेगाव), रोहन संजय आडके (वाटेगाव), नीलेश विलास डांगे (वाघेरी-कऱ्हाड), सुभाष रामचंद्र यादव, विकास बापू सूर्यवंशी (दोघे धोत्रेवाडी), अमोल अशोक खोत (दुरंदेवाडी-शिराळा) आणि सुरेश जयसिंग चव्हाण (भटवाडी-शिराळा) अशा ८ जणांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास वाटेगाव येथील म्हाताऱ्याचा डोंगर परिसरातील माऊली मंदिरासमोर असणाऱ्या सयाजी लोकरे यांच्या मालकीच्या शेतात विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या परिसरात कासेगाव पोलिसांनी छापा टाकल्यावर तेथे वरील ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. याचवेळी पोलिसांनी (एमएच १० एक्यू २८९९, एमएच १० बीआर २३३५, एमएच १० एक्यू ५२९१) ही चारचाकी वाहने आणि दुचाकी क्रमांक (एमएच १० बीसी २७४०) अशी वाहने ताब्यात घेतली, तर विकास सूर्यवंशी यांचे दोन बैल आणि तुषार घोरपडे (ओगलेवाडी-कऱ्हाड) यांचा एक बैलसुद्धा ताब्यात घेतला. हवालदार ए. व्ही. लोहार अधिक तपास करीत आहेत.