विट्यात दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:17+5:302021-05-12T04:27:17+5:30
विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करून बाजारपेठेतील दुकानांत व्यवहार सुरू ठेवणाऱ्या दोन ...
विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करून बाजारपेठेतील दुकानांत व्यवहार सुरू ठेवणाऱ्या दोन दुकानदारांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. येथील मनीषा साडी सेंटरचे मालक विष्णू विजयकुमार गलाणे (वय ३०) व राजाभाऊ किराणा दुकानांचे मालक राजेंद्र शिवाजी लकडे (५१, दोघेही रा. विटा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यापूर्वी विटा शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होण्यासाठी विटा पालिकेच्या सत्ताधारी मंडळींनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता.
त्यामुळे या कालावधीत सर्व बाजारपेठ बंद ठेवून कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु, विटा येथील गांधी चौकातील विष्णू विजयकुमार गलाणे यांनी त्यांच्या मालकीचे मनीषा साडी सेंटर सुरू ठेवून ग्राहकांना खरेदीसाठी दुकानात घेतले होते. तसेच राजेंद्र लकडे यांनीही त्यांच्या राजाभाऊ किराणा दुकानात ग्राहकांना बोलावून ते ग्राहकांना किराणा साहित्य देत होते.
याची माहिती महसूल प्रशासन व विटा पोलिसांना मिळताच पोलिसांनी या दोन्ही दुकानांवर छापा टाकला. त्यावेळी मनीषा साडी दुकान व राजाभाऊ किराणा दुकानात पोलिसांना ग्राहक मिळून आले. त्यामुळे या दोन्ही दुकान मालकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने विटा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.