सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; अमली पदार्थ विरोधी समिती झोपली आहे का ? - पृथ्वीराज पवार
By अशोक डोंबाळे | Published: October 14, 2024 06:34 PM2024-10-14T18:34:07+5:302024-10-14T18:34:16+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोलसह घंटानाद आंदोलन
सांगली : अमली पदार्थांच्या नशाखोरीतून जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. अल्पवयीन मुले मुडदे पडत आहेत. अमली पदार्थ विरोधी समिती झोपली आहे का? तिला जागे करा आणि या विरोधात कारवाई सुरू करा, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केले.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल आणि घंटानाद आंदोलन केले. यावेळी पृथ्वीराज पवार बोलत होते. भाजपसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पृथ्वीराज पवार म्हणाले, लैंगिक अत्याचारासह खून हाणामारीच्या घटनांमध्ये रोज वाढ होत आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये सहभागी गुन्हेगार हे नशेच्या आहारी असल्याचे समोर येत आहे. मुळाशी नशापुरी असेल, तर त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम पोलिस यंत्रणेने केले पाहिजे. ते होत नसेल, तर जिल्हास्तरीय समितीने त्यांना जाब विचारला पाहिजे. त्याबाबतचा ॲक्शन प्लॅन तयार करून त्यानुसार कार्यवाही केली पाहिजे. हे काहीच होत नसल्याने ढोल वाजन आणि घंटानाद आंदोलन केले.
हजारो तरुण नशेच्या आहारी गेले आहेत. गांजा आणि अमली पदार्थांमुळे सांगलीची सामाजिक सुरक्षा धोक्यात आणली आहे. दिल्लीची निर्भया, कोलकात्याची डाॅक्टर महिला, बदलापूर पाठोपाठ सांगलीत एका गुन्हेगाराने बालिकेवर सार्वजनिक ठिकाणी अत्याचार केला. व्यसनाच्या आहारी गेलेल्या या नराधमांनी सामाजिक स्वास्थ्यची चाळण केल्याचे दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे आज निवेदन देण्यात आले. यावर कारवाई न झाल्यास हजारो नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहे.
यावेळी अभिमन्यू भोसले, शशिकांत गोसावी, बाळासाहेब कोळी, दीपक शिंगाडे, अमोल गवळी, उदय मुळे, बाळ रजपूत, किशोर हेगडे, कृष्णा कडणे, माधुरी वसगडेकर, नीलेश हिंगमिरे, रवींद्र वादवणे, संदीप आवळे, सुधीर चव्हाण, उमेश पाटील, विजय साळुंखे, शुभम चव्हाण आदी उपस्थित होते.
दहा अड्ड्यांवर वॉच
पृथ्वीराज पवार म्हणाले, नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसांत आम्ही शहरातील दहा वेगवेगळ्या नशाखोरीच्या अड्ड्यांवर लक्ष ठेवून होतो. तेथे नशेसाठी येणाऱ्या काही टाेळक्यांना आम्ही हाकलून लावले. गांजाच्या चिलीम, काड्यापेटी, नशेच्या गोळ्यांची पाकिटे आढळली. आम्ही वॉच ठेवल्यामुळे नशेकरांनी त्या ठिकाणी यायचे कमी केले आहे. आता पोलिसांनी या अड्ड्यांवर लक्ष ठेवले पाहिजे.