स्थलांतर न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे, नितीन कापडणीस : पूरावेळी घर सील करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:18 AM2020-06-22T10:18:13+5:302020-06-22T10:19:53+5:30
गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे घरही सील केले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.
सांगली : गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे घरही सील केले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.
कापडणीस म्हणाले की, गतवर्षी नागरिकांनी २००५ च्या महापूराशी तुलना केली. नागरिकांचा अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे ४३ हजार कुटूंबे व सव्वा लाख लोकांना पुराचा फटका बसला. हजारो कुटूंबे पुरामध्ये अडकले. पाणी पातळी वाढत असताना नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले. पण त्याला नागरिकांनी दाद दिली नाही. त्याचा ताणही शासकीय यंत्रणेवर पडला होता. गतवर्षीच्या पुरात अनेक यंत्रणा कमी पडल्या. त्यामुळेच यंदा महापालिकेची यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे.
यंदा पूरस्थिती निर्माण झाल्यास २५ फुटापासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आत्मविश्वास न बाळगता प्रशासनाने आवाहन करताच बाहेर पडावे. स्थलांतराला दाद न देणाऱ्या नागरिकाचे घर सील करून लोकांना सक्तीने सुरक्षितस्थळी पोहचवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रसंगी अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गुन्हे दाखल करण्याची वेळ प्रशासनावर येऊ देऊ नये, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले.