आयसाेलेशनमधील रुग्ण बाहेर पडल्यास थेट पाेलिसात गुन्हे : रवींद्र सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:24+5:302021-04-28T04:28:24+5:30
वाटेगाव : आयसाेलेशनमध्ये असलेले काेराेना पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट पोलिसात गुन्हे दाखल ...
वाटेगाव : आयसाेलेशनमध्ये असलेले काेराेना पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट पोलिसात गुन्हे दाखल करणार असल्याचे प्रतिपादन वाळव्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी आढावा घेतला. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले लोकांनी सामाजिक अंतर ठेवून कोरोना महामारीला समोर जाऊया. लोकांनी कोरोनाचे नियम पळून रुग्णांची संख्या वाढणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक अविनाश मते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करावयाचा असेल तर प्रत्येकाने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. विनापरवाना बाहेर पडू नये. अन्यथा गुन्हे दाखल करू.
यावेळी वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य संध्याताई पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी बाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर, तलाठी जगन्नाथ कदम, पोलीस पाटील संतोष करांडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन समितीतील सदस्य उपस्थित होते.
चौकट
बाहेरील व्यापाऱ्यांनी गावात येऊ नये
सरपंच सुरेश साठे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला फिरून विकावा तसेच बाहेरील व्यापाऱ्यांनी गावामध्ये येऊ नये अन्यथा त्यांच्यावरती पोलीस कारवाई करणार.