सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी

By शीतल पाटील | Published: July 17, 2023 09:49 PM2023-07-17T21:49:27+5:302023-07-17T21:49:54+5:30

वान्लेसवाडी शाळेतील प्रकार, महापालिकेकडून पोलिसात फिर्याद.

criminal case against women self help group in case of food poisoning of children in sangli | सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी

सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी

googlenewsNext

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : महापालिकेच्या वान्लेसवाडी येथील शाळेत मुलांना निकृष्ट पोषण आहार दिल्याप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारी रोजी घडली. होती. पोषण आहारामुळे ३६ मुलांना विषबाधा झाली होती. याप्रकरणी शिक्षण मंडळाचे लेखापाल गजानन बुचडे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. बचत गटातील सात महिलांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

बचत गटाच्या अध्यक्ष वंदना धनंजय रुपनर, सचिव सरस्वती भगवान रुपनर, शालन आकाराम रुपनर, पार्वती लक्ष्मण कोळपे, मुक्ता महादेव रुपनर, सुरेखा संजय कोळपे, पुुजा सचिन रुपनर या सदस्याविरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वान्लेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज या शाळेत पोषण आहार व मध्यान्ह भोजन पुरविण्याचा ठेका हौसाबाई रुपनर महिला बचत गटाला देण्यात आला होता. २७ जानेवारी रोजी बचत गटाकडून मुलांना भोजन देण्यात आले. भोजनानंतर पाचवी ते सातवीच्या २७९ विद्यार्थ्यांपैकी ३६ मुलांना मळमळ, पोटदुखी, उलटी होऊ लागली. मुख्याध्यापकांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडील डाॅक्टरांना बोलावून तपासणी केली.

या मुलांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. बचत गटाकडून देण्यात आलेले अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. दरम्यान उपायुक्त स्मृती पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी एस. व्ही. हिरमेठ यांनी बचत गटाच्या स्वयंपाकगृहाची तपासणी करून अहवाल आयुक्त सुनील पवार यांना सादर केला होता. या चौकशी अहवालात मुलांना खराब अन्न पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आयुक्तांनी महिला बचत गटाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण मंडळाला दिले होते. त्यानुसार लेखापाल बुचडे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली.

स्वयंपाकगृहात अस्वच्छता, जळमटे

या महिला बचत गटाच्या स्वयंपाकगृहाची अन्न सुरक्षा अधिकारी हिरेमठ यांनी तपासणी केली. या तपासणीत स्वयंपाकगृह अस्वच्छ आढळून आले. अडगळीत साहित्य, खराब वस्तू, लाकडाचे तुकडे पडलेले होते. अन्नधान्य साठवणूकीची जागाही अस्वच्छ होती. जळमटे, किटकांचा वापर होता. भाताला वासही येत असल्याचे आढळून आले होते. तसा अहवाल हिरेमठ यांनी आयुक्तांकडे सादर केला होता.

Web Title: criminal case against women self help group in case of food poisoning of children in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.