विष्णू माने यांना फौजदारीची नोटीस : सांगली आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:29 PM2017-12-15T23:29:58+5:302017-12-15T23:34:47+5:30
सांगली : महापालिकेच्या महासभेत खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांना फौजदारी कारवाईची नोटीस
सांगली : महापालिकेच्या महासभेत खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांना फौजदारी कारवाईची नोटीस दिली आहे. आयुक्तांच्यावतीने अॅड. किरण नवले यांनी ही नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या ५ डिसेंबरच्या सभेत आयुक्तांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हंगामा केला होता. आयुक्त खेबूडकर यांच्या भूमिकेमुळे रखडलेली विकास कामे, प्रलंबित फायली यामुळे शहराचा विकास थांबला असल्याची तक्रार सदस्यांनी केली होती. या सभेत विष्णू माने यांनी आयुक्तांवर टीकाही केली होती. महासभेत झालेल्या चर्चेवरुन आयुक्तांनी संबंधित नगरसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यानुसार माने यांना आयुक्तांनी फौजदारीची नोटीस बजाविली आहे.
नोटिसीत म्हटले आहे की, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व कायद्याने काम करणारे अधिकारी म्हणून आयुक्तांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी आतापर्यंत कधीही आणि कुठेही बेकायदेशीर काम केलेले नाही. असे असताना बदनामी केली आहे. ‘खेबूडकर यांच्या कार्यकाळात सर्वाधिक बेकायदा कामे झाली असून यातील त्यांचा इंटरेस्ट उघड झाला आहे. दोन लाखाच्या कामात सतरा त्रुटी काढणारे आयुक्त ड्रेनेज ठेकेदाराला गुपचुप बिल देतात. तीन-तीन आलिशान गाड्या रातोरात ऐनवेळचा ठराव करुन खरेदी करतात. स्वत:च्या इंटरेस्टच्या फायलीत त्यांची गतिमानता असते. सुटीच्या दिवशीही वर्कआॅर्डर दिल्या जातात’, अशा पध्दतीने बेछूट आरोप केले आहेत. त्यामुळे जनमानसात बदनामी झाली आहे.
आमच्या अशिलाची बदनामी, मानहानी त्यांच्या इभ्रतीस जाणूनबुजून धक्का द्यावा, हा एकच दुष्ट व आंतरिक हेतू ठेवून आपण खोटे आरोप केले आहेत. या खोट्या आरोपांमुळे बदनामी झाली आहे. विकासाच्या योजना, शासकीय योजना नियमाप्रमाणे पूर्ण करण्यावर आयुक्तांनी भर दिल्याने काहींचे हितसंबंध दुखावले आहेत. यामुळेच असे खोटे, चुकीचे ,बेछूट आरोप केले आहेत. आपल्या वागणुकीने फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला आहे. त्यामुळे आपण शिक्षेस पात्र आहात. त्यामुळे आपणाविरुध्द फौजदारी फिर्याद दाखल करीत आहे. आरोपामुळे नाहक बदनामी झाल्याने नुकसान भरपाईचा दावाही दिवाणी न्यायालयात दाखल करीत आहे. शिवाय या बेकायदेशीर कृतीबाबत आपल्याविरुध्द राज्य सरकारकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही नोटिसीत म्हटले आहे.
महापालिकेत कारवाईवरून नव्या वादाला तोंड
महापालिकेतील नगरसेवक विष्णु माने यांना आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजाविली आहे. या नोटीसेबद्दल महापालिकेतील बहुतांशी नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही प्रशासन विरूद्ध नगरसेवक असा अनेकदा संघर्ष झाला आहे. अगदी डोळे काढण्याची भाषाही सभागृहात वापरली गेली आहे. बुटाने मारण्यापर्यंत कधीकधी जीभ घसरली आहे. पण आतापर्यंतच्या आयुक्तांनी कधी कारवाईचा बडगा उगारला नव्हता. खेबूडकर यांनी मात्र नगरसेवकाला नोटीस बजावून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यात सोमवारी १८ रोजी महासभा होत आहे. या सभेत नोटिसीवरून वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.