मोकळ्या प्लॉटधारकांना फौजदारीच्या नोटिसा; सांगली आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:25 PM2018-06-12T21:25:07+5:302018-06-12T21:25:07+5:30
शामरावनगर परिसरात १४५ खुले प्लॉट असून या प्लॉटची स्वच्छता मूळ मालकांकडून केली जात नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचून या परिसरात रोगराई पसरत आहे.
सांगली : शामरावनगर परिसरात १४५ खुले प्लॉट असून या प्लॉटची स्वच्छता मूळ मालकांकडून केली जात नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचून या परिसरात रोगराई पसरत आहे. याला जबाबदार धरून संबंधित प्लॉट मालकांवर फौजदारी का करू नये?, या आशयाचा नोटिसा प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्लॉटचे सर्व्हे प्रशासन स्तरावर सुरू झाले आहेत.
गेल्या आठवड्यात शहर परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. आता मान्सूनला सुरूवात देखील झाली आहे. याचा परिणाम शहरातील उपनगरांवर होत आहे. शामरावनगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उपनगरांचा विस्तार होत आहे. अनेकांनी या परिसरात प्लॉट घेऊन घरे बांधली आहेत, तर काहींनी रिकामे प्लॉट आहे त्या स्थितीतच ठेवले आहेत. महापालिकेच्या या परिसरात केलेल्या सर्व्हेमध्ये १४५ रिकामे प्लॉट आढळून आले आहेत. या परिसरात रस्ते व गटारी नसल्याने रिकाम्या प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भटकी जनावरे व डासांची संख्या वाढल्याने रोगराई पसरत आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढून चिकुनगुन्या, डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजार पसरत आहेत. या भागातील नागरिकांनी रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. रिकाम्या प्लॉटची स्वच्छता नसल्याने मनपा प्रशासनाने या मालकांना आता नोटिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॉटधारकांनी तातडीने आपले प्लॉट स्वच्छ करून घ्यावेत, अन्यथा फौजदारी दाखल करण्याची नोटीस देण्यात येणार आहे. तशा हालचाली आता प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने १४५ प्लॉटधारकांना फौजदारीच्या नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत आयुक्तांनी विभागप्रमुखांना सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.