निकृष्ट कामास अधिकारी जबाबदार
By admin | Published: November 19, 2015 11:40 PM2015-11-19T23:40:48+5:302015-11-20T00:19:44+5:30
समितीकडून ‘टेंभू’च्या कामाची पाहणी : अर्जुन खोतकरांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
विटा : टेंभू योजना खानापूर व आटपाडी या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. या भागातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. टेंभूची कामे निकृष्ट केल्यास क्वालिटी कंट्रोलकडून त्याची तपासणी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य शासनाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला.
राज्य शासनाच्यावतीने दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आमदारांच्या अंदाज समिती पथकाने गुरुवारी खानापूर तालुक्यातील माहुली व साळशिंगे येथील टेंभू योजनेच्या कामाची पाहणी केली. या समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. वीरेंद्र जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मिलिंद माने, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, विधान भवनचे सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव विजय कोमटवार यांच्यासह ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेचे अधिकारी उपस्थित होते.
आ. अनिल बाबर यांनी समितीतील आमदार सदस्यांचे विटा येथे स्वागत केले. समितीतील आमदार सदस्यांनी माहुली येथील टेंभू योजनेचा पंपगृह व साळशिंगे येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी समितीतील सदस्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना टेंभूसाठी वापरण्यात येत असलेल्या निकृष्ट साहित्यावरून चांगलेच धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. समितीचे अध्यक्ष खोतकर, वीरेंद्र जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अन्य सदस्यांनी साळशिंगे व माहुली येथे टेंभूच्या कामासाठी जुने साहित्य कसे वापरता? प्रत्यक्ष कामावरील साहित्याची अवस्था अशी कशी आहे? या कामाची निविदा कधी निघाली आहे? किती किलोमीटरमधील क्षेत्राला टेंभूचा लाभ मिळतो आहे? यासह अन्य प्रश्नांचा भडीमार केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रश्नांच्या भडीमाराने घामाघूम झालेल्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक उत्तरे देत आपली सुटका करून घेतली.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, खानापूर पंचायत समिती उपसभापती सुहास बाबर, खानापूर सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, माजी सभापती सुशांत देवकर, दिलीप कीर्दत, शंतनु बाबर, हेमंत बाबर, रामचंद्र भिंगारदेवे, नंदकुमार माने, सरपंच हेमंत सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
टेंभू योजनेला शासनाने निधी द्यावा : अनिल बाबर
सांगली जिल्ह्यातील एक भाग सधन, तर दुसरा आमचा भाग दुष्काळी आहे. शेतकऱ्यांना फक्त टेंभू योजनेच्या पाण्याचाच आधार आहे; मात्र आमचे तालुके पाण्यापासून वंचित राहिले आहेत. विदर्भ-मराठवाड्याच्या अनुशेषाला आमचा विरोध नाही. आमच्या वंचित राहिलेल्या दुष्काळी तालुक्यातील ‘टेंभू’च्या उर्वरित कामासाठी निधी देण्यास समितीने राज्य शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना निधी मागू नका : जगताप
राज्यात पश्चिम महाराष्ट्राचा सिंंचनात ७० ते ८० टक्के, तर विदर्भ-मराठवाड्याचा केवळ ७ ते ८ टक्केच रेशो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळींमुळेच सांगली जिल्ह्यातील काही तालुके सिंचनापासून वंचित राहिले. हा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या इच्छाशक्तीचा दोष असून, त्यात आमचा दोष नाही. जलसिंचनात राज्याच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्याचा रेशो वाढत नाही व विदर्भ-मराठवाडा सिंचनात सक्षम होत नाही, तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी जास्तीचा निधी मागू नये, असे मत अमरावतीचे आ. वीरेंद्र जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.