दोन दिवसात ४0 व्यापाऱ्यांवर फौजदारी
By admin | Published: December 8, 2014 11:51 PM2014-12-08T23:51:24+5:302014-12-09T00:25:54+5:30
महापालिकेकडून छाननी : नव्याने नोंदणी नाही, थकबाकीची चिंता
सांगली : महापालिकेने गत आठवड्यात एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली होती. येत्या दोन दिवसात आणखी ४0 व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी महापालिकेने अशा कर न भरलेल्या, नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांची छाननी पूर्ण केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिका व व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. एलबीटी कायद्यांतर्गत महापालिकेकडे ९ हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील २ हजार व्यापारीच नियमितपणे कर भरत आहेत. अन्य व्यापाऱ्यांनी करावर बहिष्कार टाकल्यामुळे शहरातील विकासकामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे महापालिकेने कायद्यातील तरतुदीअंतर्गतआता कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. न्यायालयात संबंधित व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाईसाठीफिर्याद दाखल केली आहे. गत आठवड्यात महापालिकेने न्यायालयात १६ व्यापाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली होती. यामध्ये सांगलीतील १३ आणि मिरजेतील ३ व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महापालिकेने आणखी ४0 व्यापाऱ्यांची यादी तयार केली असून, त्यांच्यावरही येत्या दोन दिवसात फिर्याद दाखल केली जाणार आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत महापालिकेच्या एलबीटी उत्पन्नात जवळपास ११0 कोटी रुपयांची तूट आहे. विवरणपत्रे दाखल करण्याबाबत ९ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यातील केवळ दीड हजार व्यापाऱ्यांनीच विवरणपत्रे दाखल केली आहेत. (प्रतिनिधी)