जतच्या दोन बीडीओंसह बाराजणांवर फौजदारी
By admin | Published: February 17, 2017 12:19 AM2017-02-17T00:19:50+5:302017-02-17T00:19:50+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश; ‘मनरेगा’मध्ये ३६.७४ लाखांचा अपहार
सांगली : एकुंडी, काशिलिंगवाडी (ता. जत) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी (मनरेगा) योजनेत बोगस कामे दाखवून ३६ लाख ७४ हजारांचा अपहार झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. यामध्ये जतचे तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्यासह बाराजणांचा समावेश असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
जत तालुक्यातील मनरेगा घोटाळ्याचे प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर सखोल चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे
प्रकल्प संचालक अजयकुमार माने, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, लेखा व मुख्य वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, तहसीलदार अभिजित पाटील, कार्यकारी अभियंता एस. ए. बारटक्केयांची समिती स्थापन केली होती. या समितीने प्रत्यक्ष जत पंचायत समिती आणि एकुंडी, काशिलिंगवाडी, बाज या तीन गावांना भेटी देऊन कागदपत्रांची चौकशी केली होती. याचा अहवाल डॉ. भोसले यांच्याकडे सादर झाला असून, त्यांनी तत्काळ दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
वार्षिक कृती आराखड्यात एकुंडी गावाचा समावेशच नव्हता. तरीही मनरेगाची बोगस कामे केल्याचे दाखविले आहे. ग्रामपंचायतीचा प्रस्ताव, हजेरी पुस्तक, प्रशासकीय तांत्रिक मान्यतेची नोंद नाही. आॅनलाईन बोगस जॉबकार्ड आणि मस्टर तयार करून २७० मजुरांच्या नावावर २४ लाख १९ लाखांचा अपहार केला आहे. या प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी गहाणे, प्रभारी गटविकास अधिकारी मडके, कनिष्ठ लेखाधिकारी प्रवीण माने आणि चंद्रकांत कोरे, मल्लिकार्जुन जेऊर, स्वप्निल कोळी, परशुराम कोळी, आनंद हिरगडे या पाच कंत्राटी डाटा आॅपरेटरांवर अपहाराची रक्कम निश्चित केली आहे. यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांची नियुक्ती डॉ. भोसले यांनी गुरुवारी केली आहे.
काशिलिंगवाडी येथील चार माती नालाबांधच्या जुन्याच कामांवर यंत्राच्या साहाय्याने मोडतोड करून नवीन बांधल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीने दुरुस्तीचा प्रस्ताव दिला असताना नवीन बांधल्याचे दाखवून अधिकाऱ्यांनी १२ लाख ५५ हजारांचा अपहार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.
यामध्ये तत्कालीन व प्रभारी असे दोन गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी कैलासकुमार मरकाम, ग्रामरोजगार सेवक राहुल देवांग, ग्रामसेवक सचिन सरक, सरपंच एन. डी. बजबळे, लेखाधिकारी प्रवीण माने यांचा समावेश आहे. एकुंडी आणि काशिलिंगवाडी या दोन गावांतील ३६ लाख ७४ हजारांच्या अपहारप्रकरणी दोन गटविकास अधिकारी यांच्यासह बाराजणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांना दिले आहेत. दोषारोपपत्राच्या कागदपत्रांसह संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
बाज प्रकरणात बीडीओ, सरपंचांसह पाचजणांना नोटिसा
बाज येथील पाच सिमेंट बंधाऱ्यांची कामे मनरेगाचे नियम मोडून केली आहेत. ग्रामपंचायतीने कामे करण्याऐवजी ठेकेदाराकडून सर्व कामे केली आहेत. यामध्ये ४५ लाख ३२ हजार ३०० रुपयांच्या खर्चात अनियमितता दिसून येत आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, सहायक लेखाधिकारी आणि छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.