सांगलीत कैद्यांभोवती गुन्हेगारांचा गराडा..!
By admin | Published: July 14, 2014 12:26 AM2014-07-14T00:26:46+5:302014-07-14T00:32:56+5:30
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : शासकीय रुग्णालयातील चित्र
सचिन लाड : सांगली, औषधोपचारासाठी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) आणलेल्या कैद्यांभोवती गुन्हेगारांचा गराडा पडत आहे. विविध विभागात तपासणीच्या नावाखाली कारागृहातील कैद्यांना रुग्णालयात फिरविले जाते. त्यांच्याभोवती गुन्हेगारांचा गराडा एवढा पडतो की, कैदी व त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्यामधून दिसतही नाहीत. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रुग्णालय आहे. एखाद्या कैद्याने आजारी असल्याची तक्रार केली, तर त्याच्यावर तातडीने प्राथमिक औषधोपचार केले जातात. यातूनही कैद्याची प्रकृती सुधारली नाही, तर त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले जाते. कारागृहाबाहेर कैद्याला नेल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर येते. चार ते पाच कैदी असतील, तर किमान सहा पोलीस सुरक्षेसाठी येतात. पोलीस वाहनातून त्यांना रुग्णालयात आणले जाते. त्यांना प्रथम आकस्मिक दुर्घटना विभागात नेले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पुढे अन्य विभागात विविध तपासण्या करण्यासाठी त्यांना फिरविले जाते. तपासणीसाठी अन्य रुग्णांची गर्दी असेल, तर कैद्यांना बाहेर बाकावर बसविले जाते. तत्पूर्वी कैद्यांचे नातेवाईक व गुन्हेगार समर्थकांना याची माहिती पोहोचलेली असते. त्यामुळे ते कैद्याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच तेथे हजर झालेले असतात.
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना रुग्णालयात तपासणीला आणल्यानंतर, त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तरीही पोलीस कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येते. पाच ते सहा कैदी असतील, तर कोणाच्याही हातात बेडी दिसत नाही किंवा एकमेकांना दोरीनेही बांधलेले नसते. पोलिसांच्या हातात बंदुकही दिसत नाही. दीड ते दोन तास कैदी रुग्णालयात असतात. या काळात त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांसह गुन्हेगारही हजेरी लावतात. त्यांच्यात बराच वेळ गप्पा सुरू असतात. तपासणीनंतर जाताना अगदी पोलीसगाडीत बसेपर्यंत हे गुन्हेगार कैद्यांसोबत असतात. अशावेळी पोलीस बघ्याची भूमिका का घेतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.