गुन्हेगारांचा सांगलीत शिरकाव
By admin | Published: September 25, 2014 10:42 PM2014-09-25T22:42:16+5:302014-09-25T23:28:03+5:30
सावधान : सणासुदीचे दिवस; बँका, सराफ कट्टा ‘टार्गेट’
सचिन लाड - सांगली -विजयादशमी दसरा आणि दिवाळी हे सणासुदीचे दिवस असल्याने बाहेरील जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांनी सांगलीत शिरकाव करून, बँका व सराफ कट्टा ‘टार्गेट’ केले आहे. बँकेत पैसे काढून व सराफी दुकानातून दागिने खरेदी करुन येणाऱ्या नागरिकांना लुबाडण्याचा उद्योग या टोळीने सुरु केला आहे. अवघ्या दोन ते तीन मिनिटात लाखोंच्या घरात हात मारुन चोरटे पसार होत आहेत. यामुळे नागरिकांनीच सोने खरेदी करताना व बँकेतून पैसे काढल्यानंतर सावधानता बाळगायला हवी. महिला व नागरिक दागिने व लाखो रुपयांची रोकड बॅगेत ठेवतात. ही बॅग त्यांच्या हातात असते. ती लांबविण्यास चोरट्यांना कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही.
पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा दिल्या जात आहेत. लुटीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. मात्र अलीकडे गुन्हेगारांच्या चोरी करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. हे गुन्हेगार पंचवीस ते तीस वयोगटातील आहे. त्यांना शोधून रेकॉर्डवर आणणे आव्हान झाले आहे. यासाठी पोलिसांनी अनेकदा विशेषत: जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सराफ व बँकांना सीसी टीव्ही कॅमेरा दुकानात तसेच बाहेरही लावण्याची सूचना केली होती. परंतु या सूचनेचे पालन केले नाही. परिणामी दुकानाबाहेर लुटीची घटना घडली, तर चोरट्यांचा शोध घेण्यात कोणतीच मदत होत नाही. यामुळे ज्याला लुटले आहे, त्याची तपासात मदत घेतली जाते.
रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याची सूचना देणारे फलक लावण्यासाठी बँकांना आवाहन केले आहे. बँकांची बैठक बोलाविली आहे. त्यांना बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सूचना देणार आहे. बँका व सराफ कट्टा परिसरात पथकास गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.
-प्रकाश गायकवाड,
पोलीस उपअधीक्षक, सांगली
पोलीस बंदोबस्तात... गुन्हेगार चोरीत
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. नवरात्रोत्सव सुरु आहे. सकाळी दुर्गा दौड, रात्री दांडिया, तसेच उमेदवारांकडून अर्ज भरण्याची लगबग... या सर्वांसाठी सध्या पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. ही चोरट्यांना चालून संधी आली आहे. चोरट्यांची ही टोळी बाहेरील जिल्ह्यातून आली आहे. चोरटे दागिने व व रोकड असलेल्या बॅगा लंपास करीत आहेत.
बँकेत व सराफी दुकानात नेहमीच गर्दी असते. या गर्दीत साधू-संत आहेत की चोरटे, हे कोणाला कसे कळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा हात मारण्यासाठी किमान चार ते पाचजण बँक किंवा सराफ कट्टा परिसरात घुटमळतात. यामध्ये ग्राहकाच्या मागावर एक, बाहेर दोघेजण वाहन घेऊन उभे असतात, तर चौथा हातातील बॅग पळविण्यासाठी सज्ज असतो.