सरकारच्या कोटा पद्धतीमुळे संकट
By admin | Published: September 28, 2016 11:19 PM2016-09-28T23:19:34+5:302016-09-29T00:00:41+5:30
मानसिंगराव नाईक : विश्वास साखर कारखान्याची वार्षिक सभा
शिराळा : केंद्र-राज्य शासनाने व्यापाऱ्यांबरोबर साटेलोटे केले आहे. यामधून आता साखर साठ्याबाबत ‘कोटा’ पध्दत आली आहे. या पध्दतीमुळे व्यापारी गबर होणार आहेत, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी ऊसदर मिळणार आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येणार असल्याचे प्रतिपादन विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बुधवारी केले.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात कारखान्याच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावर्षीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त रक्कम देऊन येणारी दिवाळी गोड करणार असल्याचे यावेळी अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
यावेळी नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनकडे वळावे, यासाठी कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. यातून शेतकऱ्यांना कर्ज व अनुदान देण्यात येणार आहे. गतवेळी दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळत होता. तो ऊस अग्रक्रमाने उचलून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळले, यामुळे साखर उतारा कमी आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची साखर उद्योगात मक्तेदारी असल्याचे समजून, केंद्राने साखर उद्योग अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन शुल्क शंभर रुपये तसेच इथेनॉलवर प्रतिलिटर सहा रुपये कर वाढविल्याने ऊसदर कमी मिळणार आहे. या कोटा पध्दतीने साखर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आल्याने साखर दर ढासळणार आहेत. साखर दर कमी झाल्यास शेतकऱ्यांना ऊस दर कमी मिळणार आहे. या शासनाच्या निर्णयाविरुध्द साखर कामगार संघाकडून न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
यावेळी अभिजित नाईक, पी. के. पाटील, मारुती नलवडे, दत्ताजीराव साळुंखे, रामचंद्र पाटील, बाबूराव पाटणकर यांनी ठराव मांडले. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. सभेत सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी अहवाल वाचन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.
उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, अमरसिंह नाईक, शिवाजीराव पाटील, राजेंद्र नाईक, संजय नाईक, वीरेंद्र नाईक, पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, भगतसिंग नाईक, सुरेशराव चव्हाण, युवराज गायकवाड, दिनकर महिंद, भीमराव गायकवाड, विश्वास कदम, संभाजीराव पाटील, डॉ. राजाराम पाटील, तानाजी साळुंखे, डॉ. अरविंद पवार, अभिमन्यू निकम यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)