दातृत्वाचा मानदंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:17+5:302021-05-11T04:27:17+5:30
सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांचा कैवारी व दीनदुबळ्या, गोरगरीब जनतेचा आधार म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या स्वभावामुळे दानशूर ...
सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांचा कैवारी व दीनदुबळ्या, गोरगरीब जनतेचा आधार म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या स्वभावामुळे दानशूर म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या नानासाहेब महाडिक या पहाडासारख्या दातृत्वाच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य मात्र पोरके झाले. त्यांचा आज द्वितीय स्मृतिदिन त्यानिमित्त...
इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक होती. नेहमीप्रमाणे त्याकाळात विरोधी गटात उमेदवारांची वानवा असायची. राहुलदादा महाडिक यांनी मला सांगितले, ‘कपिल, तू लढायचं आहे.’ सकाळी पेठनाक्यावर गेलो. पंपावर नेहमीप्रमाणे नानासाहेब मित्रांत रममाण झाले होते. का आलास म्हणून विचारले. राहुलदादांनी सांगितले, ‘हा आपला गांधी चौकातला उमेदवार आहे.’ नानासाहेबांनी संमती दिली. ‘काळजी करू नकोस, कमी पडू देत नाही’, हा आश्वासक आवाज दिला. माझा विजय झाला. त्यानंतर बरेचजण मला भेटायला येत होते. परंतु हे सर्व घडले, ते नानासाहेबांच्या खंबीर आधारामुळे.
आमचा पिंड राजकीय नाही. परंतु, महाडिक परिवाराचा आदेश शिरसावंद्य मानून वाटचाल करीत असतो. त्यांची छाया आम्हाला पितृतुल्य समान होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. नजरेत विश्वास, धिप्पाड शरीरयष्टी, पांढराशुभ्र पेहराव आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाचे नानासाहेब सर्वसामान्यांच्या गराड्यात असायचे. छोट्या-छोट्या कामापासून अनेक प्रकारच्या समस्या नानासाहेबांच्या दरबारात येत असायच्या. अनेकांना त्यांनी न्याय दिला. माणसे उभी केली आहेत. फाटक्या, मळक्या कपड्यातील व्यक्तीपासून मध्यम व उच्चवर्गातील व्यक्तीही त्यांच्यासोबत असत. त्यांची पाहुणचाराची ख्याती सर्व परिचित आहे. त्यांच्यातील हा स्वभाव घेण्याचा आमचा अल्पशा प्रयत्न असतो. जोपर्यंत आपल्याकडे जे आहे, त्यातील काही वाटत राहू, तोपर्यंत परमेश्वर काही कमी पडून देत नाही, हा त्यांचा वसा जपला आहे.
त्यांनी उद्योग क्षेत्रातून सामाजिक, राजकीय क्षेत्राला सुरुवात केली. या परिसरात विरोधी गट शाबूत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणात नेहमीच ते संघर्ष करीत राहिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर कुस्ती कलाही जोपासली. त्यांचे सांगली जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.
नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली व्यंकटेश्वरा उद्योग समूहाने आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे अनेकांना आर्थिक मदत मिळाली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. नानासाहेबांच्या अचानक जाण्याने राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रातील न भरून येणारे नुकसान झाले आाहे. त्यांच्या स्मृती चिरंतन आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे.
- कपिल ओसवाल, माजी नगरसेवक