देशात आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती

By admin | Published: February 21, 2016 01:03 AM2016-02-21T01:03:04+5:302016-02-21T01:03:04+5:30

सीताराम येचुरी : नरेंद्र मोदी हिटलर, मुसोलिनी बनू पाहात आहेत; फॅसिझम व्यवस्थेचे षड्यंत्र

Critical situation than emergency in the country | देशात आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती

देशात आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती

Next

इस्लामपूर : देशात सध्या आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती आहे. हिंदू धर्मराष्ट्राची संकल्पना मांडत राष्ट्रवादाच्या नावाखाली फॅसिझम व्यवस्था आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलर आणि मुसोलिनी बनू पाहात आहेत, असा घणाघाती हल्ला मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खा. सीताराम येचुरी यांनी चढवला.
इस्लामपूर (जि. सांगली) येथे निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सत्कार सोहळ्यात खा. येचुरी बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी येचुरी यांच्याहस्ते सायनाकर यांचा सत्कार करण्यात आला.
येचुरी म्हणाले की, साम्राज्यवाद, धार्मिक कट्टरतावाद आणि उच्चस्तरीय शिक्षण संस्थांमधील वाढता हस्तक्षेप अशा तिन्ही मुद्द्यांवर भाजपचे राज्यकर्ते हिंदू राष्ट्राचा अजेंडा राबवत आहेत. देशाची एकता व अखंडता धोक्यात आणून देशाचे तुकडे पाडण्याची नीती आखली जात आहे. देशातील फक्त १०० व्यक्ती अब्जाधीश आहेत. देशाचा मानवी विकास निर्देशांक हेच लोक ठरवतात. देशातील ९० टक्के कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ‘मेक-इन-इंडिया’सारखी घोषणाबाजी फसवणूक करणारी आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, कर्तबगार विद्यार्थ्यांची पिढी घडवणाऱ्या प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी श्रमजिवी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून ते आदरणीय आहेत. समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सायनाकरांचा अमृतमहोत्सवी गौरव इतरांना पथदर्शी आहे.
आ. जयंत पाटील म्हणाले की, मूल्यांची जपणूक करुन जगणारी माणसे आयुष्यात समाधानी असतात, त्यामध्ये सायनाकरांचा समावेश आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नवीन पिढी घडवण्यास उपयुक्त ठरतील.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य सायनाकर म्हणाले की, माझे विद्यार्थी नवीन पिढी घडवण्याची परंपरा जपत आहेत, याचा अभिमान वाटतो.
धनाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. अमृतमहोत्सवी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य एल. जी. दाभोळे यांनी स्वागत केले. संजय बनसोडे, कालिदास पाटील, रवी बावडेकर यांनी सूत्रसंचालन केले. निसर्ग कला मंचच्या कलाकारांनी कष्टकऱ्यांची गीते गायली. प्रा. शामराव पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास संपतराव पवार, व्ही. वाय. पाटील, अरुण लाड, अजितराव सूर्यवंशी अ‍ॅड़ बी. एस. पाटील. डॉ. जे. एफ. पाटील, अ‍ॅड़ सुभाष पाटील, दादासाहेब मंत्री, अ‍ॅड. बी. डी. पाटील, शहाजी पाटील, डॉ. प्रदीप शहा, पै. हणमंतराव पाटील, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील उपस्थित होते. प्रा. एस. डी. पाटील, एकनाथ पाटील, सतीश चौगुले, डॉ. सूरज चौगुले यांनी संयोजन केले. (वार्ताहर)

Web Title: Critical situation than emergency in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.