मगरीचा जलतरणपटूवर जबरी हल्ला; प्रसंगावधान राखून केली जबड्यातून सुटका
By घनशाम नवाथे | Updated: April 14, 2025 16:44 IST2025-04-14T16:43:22+5:302025-04-14T16:44:13+5:30
जोरदार प्रतिकार पाहून मगर गायब झाली. तेव्हा जाधव सुरक्षित बाहेर आले.

मगरीचा जलतरणपटूवर जबरी हल्ला; प्रसंगावधान राखून केली जबड्यातून सुटका
घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : येथील कृष्णामाई जलतरण संस्थेचे सदस्य शरद दत्तात्रय जाधव (वय ५६, रा. एकता कॉलनी, मार्केट यार्ड, सांगली) यांच्यावर सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास कृष्णा नदीत पोहताना मगरीने हल्ला केला. उजवा पाय जबड्यात पकडल्यानंतर जाधव यांनी प्रसंगावधान राखून डाव्या पायाने मगरीच्या जबड्यावर प्रहार केला. जोरदार प्रतिकार पाहून मगर गायब झाली. तेव्हा जाधव सुरक्षित बाहेर आले.
उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे कृष्णा नदीत पोहण्यांची संख्या वाढली आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत गर्दी दिसून येते. कृष्णामाई जलतरण संस्थेचे सदस्य शरद जाधव हे नेहमी मित्रांसमवेत पोहण्यासाठी घाटावर येतात. सोमवार पहाटे ५.३० च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी माई घाटावर आले होते. मित्र काठावर पोहत असताना जाधव हे नदीपात्रात जवळपास मध्यभागी गेले होते. त्यांच्या आजूबाजूला कोणी नव्हते. तेवढ्यात पात्रातून अचानक आलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचा उजवा पाय मगरीने जबड्यात पकडला. मगर त्यांना खेचू लागली. अचानक झालेल्या हल्लानंतर जाधव सावध बनले. घाबरून न जाता त्यांनी डाव्या पायाने मगरीच्या तोंडावर जोरदार प्रहार केला.
मगरीच्या जबड्यावर प्रहार झाल्यानंतर मगर जबड्यातून पाय सोडला. ती पात्रात गायब झाली. तेव्हा जाधव हे पोहत काठावर आले. काठावर असलेल्या त्यांच्या मित्रांनी तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यांच्या उजव्या पायात मगरीचे दोन दात घुसल्यामुळे तेथे जखम झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती उत्तम आहे. दुपारी १ वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. पुढील काही दिवस त्यांना उपचारासाठी रुग्णालयात यावे लागेल असे सांगण्यात आहे. मगरीच्या हल्ल्याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
काळ आला होता पण...
शरद जाधव हे कृष्णामाई जलतरण संस्थेचे सदस्य आहेत. नियमितपणे ते पोहतात. त्यामुळे मगरीने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान राखून जबड्यातून पाय सोडवून ते काठावर पोहोचले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आली.
मगरीचे सातत्याने दर्शन
पोहायला गेलेल्यांवर मगरीने हल्ला केल्याच्या पाच ते सहा घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. घाटावर कृष्णेत मगरींचा वावर असल्याचा इशारा देणारा फलक लावला आहे. तसेच मगरीपासून सुटका कशी करायची याचीही माहिती दिली आहे. नुकतेच आठवड्यापूर्वी मगरीचे दर्शन घडले होते. त्यामुळे पोहणाऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी सुटका करून घेतली. परंतू इतरांवर झाल्यानंतर ते काय करणार? कशी सुटका करून घेणार? शेकडो नागरिक पोहायला येतात. - शरद जाधव, जखमी जलतरणपटू