राजकारणाने आटपाडी टंचाईग्रस्त

By admin | Published: November 2, 2016 11:12 PM2016-11-02T23:12:57+5:302016-11-02T23:12:57+5:30

राजेंद्रअण्णा देशमुख : ‘टेंभू’च्या आवर्तनाचे नियोजन अद्याप का नाही

Crocodile Scarcity With Politics | राजकारणाने आटपाडी टंचाईग्रस्त

राजकारणाने आटपाडी टंचाईग्रस्त

Next

  अविनाश बाड ल्ल आटपाडी
टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात येऊन दोन वर्षे झाली. आतापर्यंत सगळ्या मोटारी सुरू होऊन पूर्ण क्षमतेने पाणी यायला पाहिजे होते, पण सध्या येत असलेल्या पाण्याचा उचल परवाना शेतकऱ्यांना दिला जात नाही. याचे एकमेव कारण राजकारण आहे, असा आरोप करून उरमोडी योजनेच्या लाभक्षेत्रात माणगंगा नदीचा समावेश नसताना म्हसवडला तिथे आमदार गोरे यांनी माणगंगा नदीत पाणी आणलं. ते विरोधी पक्षातील आमदार आहेत, पण इथले आमदार सत्तेत असूनही टेंभूच्या पाण्याची आवर्तने ठरवली जात नाहीत, अशी खंत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुुख यांनी व्यक्त केली.
माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात बुधवारी आटपाडीतील मोडकळीस येत चाललेल्या उत्तरेश्वराची यात्रा उर्जितावस्थेत आणण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पत्रकारांशी राजेंद्रअण्णांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. ते म्हणाले, सध्या टेंभूच्या पाण्याबाबत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, अशी अवस्था आहे. दोन वर्षे झाली तरी अजून टेंभूच्या पाण्याचे पूजनच चालू आहे. पहिल्यांदा पाणी आले तेव्हा आनंद होणं, पूजन करणं स्वाभाविक आहे, पण शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पैसे भरले, त्याचे पाणी आल्यावरसुद्धा कोण-कोण पाय धुतंय? याचा शेतकऱ्यांना, शेतीला काय फायदा होणार? तालुक्यातले शेतकरी पाणी मागताहेत, ते फुकट द्या, असा आग्रह नाही, पण जर परवाने दिले आणि सर्व ओढ्यांना बंधारे बांधून जलसंधारणाचे चांगले काम झाले. त्यामध्ये दर दोन महिन्यांनी पाणी सोडले तर तालुक्यातील शंभर टक्के शेती हिरवी होईल. दर दीड किलोमीटरच्या दरम्यान ओढे आहेत. त्यामुळे शासनाला सध्या लगेच काही निधी खर्च करण्याचीही आवश्यकता नाही.
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका विचारली असता, ते म्हणाले, आमची सगळ्यांशी मैत्री करून झाली, पण सगळे आपल्याला विरोधकच मानत असतील तर मैत्री कशी होणार? आपल्याशी काहींनी आपले कार्यकर्ते फोडण्यासाठीच मैत्री केली. आपण नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. आमदारकीच्या काळातही विट्यात-खानापूर तालुक्यात जाऊन स्वत:चा गट निर्माण केला नाही. ते अवघड नव्हते. आजही आपण विकासाचेच राजकारण करतो. कुणालाही त्याबाबतीत विरोध करत नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांच्याबाबतीत काही विरोधक लगेचच टोकाची भूमिका घेतात. त्यांनी जरा सकारात्मक भूमिका घ्यायला शिकावे.
पंचायत समिती निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख यांना ‘लॉँच’ करणार काय, या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्या कुटुंबावर सर्वसामान्यांचे प्रेम आहे. पण इतरांना संधी मिळावी यासाठी आम्हाला थांबावे लागते. राजकारणीच फक्त लोकांची कामे करतात, असं कुठं आहे. मात्र तरीही ही याबाबतीत बघू, असे म्हणून स्पष्ट उत्तर देणे त्यांनी टाळले. सध्या उत्तरेश्वराची यात्रा चांगली होण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. टेंभूच्या पाण्याचे नियोजन झाले आणि तालुका सक्षम झाल्यावर आपोआपच या यात्रेला पुन्हा वैभव प्राप्त होईल. तोपर्यंत प्रयत्न करावे लागतील.
शून्यातून तालुक्याचा आवाज मोठा केला...
आटपाडी तालुक्यात आजही स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. सगळ्या देशात पाऊस झाला, पूर आला तरीही यंदा तालुक्यात पाऊस झाला नाही. सध्या ज्वारीची पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत. या परिस्थितीने इथल्या माणसांना सोशिक बनविले. अशा परिस्थितीत आपण तालुक्याचा आवाज मोठा केला, असे सांगतानाच भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही तलुक्याचा आवाज मोठा केला, अशी स्पष्ट भूमिका राजेंद्रअण्णा देशमुख यांनी व्यक्त केली.
 

Web Title: Crocodile Scarcity With Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.