Sangli: इस्लामपुरात 'पीकविमा' व्यवस्थापकाला मारहाण, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 06:31 PM2024-08-21T18:31:25+5:302024-08-21T18:32:15+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील शेतकऱ्यांकडे पीकविमा पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला आमदार बच्चू कडू प्रणीत प्रहार शेतकरी संघटनेचे ...
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील शेतकऱ्यांकडे पीकविमा पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला आमदार बच्चू कडू प्रणीत प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख दिग्विजय पाटील यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चोप दिला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
उरूण परिसरातील शेतकरी पांडुरंग हरी पाटील, लक्ष्मण हरी पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचा १ रुपया भरून शासनाच्या धोरणानुसार पीकविमा काढला होता. सततच्या अतिवृष्टीमुळे या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या पीकविमा कंपनीचे अधिकारी नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आले होते. यातील दोघांनी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार प्रहारच्या दिग्विजय पाटील यांच्याकडे आली होती.
पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांच्या कार्यालयात येऊन पीक विम्याच्या पंचनामा पद्धतीबाबत विचारणा केली. त्यावर चव्हाण यांनी पंचनामा करताना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कृषी सहाय्यक अधिकाऱ्यास सोबत घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगतपणे केलेले पंचनामे ग्राह्य धरले जात नाहीत, असेही सांगितले.
यावर पाटील यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाकडे शेतकऱ्यांच्या समक्ष तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समोरच पैशांच्या मागणीबाबत विचारणा केली. व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे देताच संतप्त झालेल्या दिग्विजय पाटील यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावत त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.
प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे. पीकविमा पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याच्या लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी दिल्यास त्या पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवू. पैशाची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. - इंद्रजित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी इस्लामपूर.