जिल्ह्यातील ६३३ गावांची पीक पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:26+5:302021-01-09T04:22:26+5:30
सांगली : खरीप व रब्बी गावांचे वर्गीकरण केल्याप्रमाणे खरीप ६३३ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी शासनाच्या ...
सांगली : खरीप व रब्बी गावांचे वर्गीकरण केल्याप्रमाणे खरीप ६३३ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहाणार आहेत तसेच सध्या तर जिल्हा प्रथमच टँकरमुक्त झाल्याचे दिसत आहे. एप्रिल, मे महिन्यात जत तालुक्यातील काही गावांनाच टंचाईची झळ पोहोचणार आहे.
जिल्ह्यातील एकूण ७३६ गावांपैकी अंतिम पीक पैसेवारी खरीप हंगामातील ६३३ गावांची जिल्हाधिकारी यांनी जाहिर केली आहे. जत तालुक्यातील १२३ गावांपैकी ६९, आटपाडी तालुक्यातील ६० पैकी ३४ अशा १०३ रब्बी गावांची पैसेवारी जाहीर केली नाही. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, कडेगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शंभर टक्के गावांची पीक पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत प्रथमच संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त लागल्याचे दिसून येत आहे. पीक पैसेवारी जास्त लागल्यामुळे जिल्ह्यात कुठेही पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी खूप मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. टंचाईच्या उपाययोजनाही राबविता येणार नाहीत. जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचन योजनांचे पाणी गेले नाही. तेथे पाऊसही कमी पडतो, त्याठिकाणी एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
चौकट
यांना मिळतो लाभ
दुष्काळ ठरविण्यासाठी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्त उपाययोजनांचा लाभ देण्यात येत होता. भरपाईच्या दरात राज्यानेही वाढ केली आहे. कोरडवाहू शेतीसाठी चार हजार ५०० रुपयांवरून सहा हजार ८०० रुपये, बागायतीसाठी ९ हजार रुपयांवरून १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १२ हजार रुपयांवरुन १८ हजार रुपये भरपाई दिली जाते.
चौकट
तालुकानिहाय पैसेवारी
मिरज ७२
तासगाव ६९
क.महांकाळ ६०
जत ५४
खानापूर ६८
आटपाडी २६
पलूस ३५
कडेगाव ५६
वाळवा ९८
शिराळा ९५