सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:39 PM2022-11-23T15:39:47+5:302022-11-23T15:40:10+5:30

लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे.

Crops in 85 acres are in danger due to stone crusher dust in Bhoset in Sangli | सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

googlenewsNext

मालगाव : भोसे (ता. मिरज) येथे जाधव मळ्यातील अंकुश जाधव या शेतकऱ्याने संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. शेजारीच सुरू असलेल्या स्टोन क्रशरमधील धुळीमुळे उतरणीला आलेले द्राक्षपीक खराब झाले, त्यामुळे बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. दरम्यान, धुळीमुळे तब्बल ८५ एकर क्षेत्रातील शेती संकटात सापडली आहे.

भोसे येथे जाधववस्तीलगत क्रशर सुरू आहे. क्रशरचालकाकडून धूळ नियंत्रित केली जात नसल्याने दोन-तीन किलोमीटरमधील परिसर झाकोळून गेला आहे. घरांमध्ये धूळ साचत असून पिके वाया जात आहेत. सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ८५ एकर क्षेत्रांतील शेती चार वर्षांपासून धुळीने माखत आहे. कडधान्य, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांवर धूळ बसल्याने ती जळून जात आहेत. लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे.

क्रशर बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचा अखंड लढा सुरू आहे. पंधरा दिवसांत क्रशर बंद झाला नाही, तर कुटुंबासमवेत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी क्रशरची पाहणी करून पंचनामा केला.

शेतकऱ्यांना श्वसनविकारांनी ग्रासले

क्रशरमधून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे शेतकरी व परिसरातील रहिवाशांना अनेक श्वसनविकारांनी ग्रासले आहे. चेहऱ्यावर मास्क लावून कामे करावी लागत आहेत. वयोवृद्धांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे.

स्टोन क्रशर सुरु झाल्यापासून शेतीतून रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. पिकांवर धुळीचा थर बसल्याने वाढ खुंटत आहे. फळधारणा बंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती पड टाकावी लागत आहे. - अंकुश जाधव, शेतकरी, भोसे.

Web Title: Crops in 85 acres are in danger due to stone crusher dust in Bhoset in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.