दामदुप्पटचे आमिष: सांगलीतील कंपनीकडे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले, तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:59 PM2022-11-18T15:59:32+5:302022-11-18T16:02:31+5:30
पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.
सांगली : सहा वर्षांत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने सांगलीतील एका कृषी उद्देशीय कंपनीत सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. विश्रामबागस्थित या कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
येथील पर्ल्स कंपनीने काही वर्षांपूर्वी हजारो लोकांना गंडा घातला होता. सांगलीतील ‘पर्ल्स’चे कार्यालय बंद झाल्यानंतर व गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानंतर त्यातील काही कारभाऱ्यांनी सांगलीत सात वर्षांपूर्वी कृषी उद्देशीय कंपनीची स्थापना केली. ‘पर्ल्स’च्याच एजंटांना त्यांनी या कंपनीकडे वळविले व व्यवसाय सुरू केला. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटकातही त्यांनी जाळे टाकले. गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपये कंपनीकडे जमा केले. जादा व्याजाच्या योजनेला लोक बळी पडले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एजंट व गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर सोसायटीच्या काही संचालकांनी फोन बंद केले आहेत. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी सध्या गुंतवणूकदारांचे सांगलीत हेलपाटे सुरू आहेत.
तक्रारदारांच्या इशाऱ्यानंतर तडजोडी
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पैशासाठी तडजोडी करण्यात आल्या. कंपनीचे अध्यक्ष व संचालकांनी तक्रारदार पोलिसांपर्यंत जाऊ नयेत म्हणून एकूण गुंतवणुकीतील ५० ते ७० टक्के रक्कम काही लोकांना दिली. त्याचवेळी हजारो गुंतवणूकदारांवर दबाव आणून त्यांना शांत केले आहे.
तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती
पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.
अध्यक्षांचा फोन बंद
कंपनीच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. कंपनीने गुंतवणूकदारांचे ८० टक्के पैसे दिल्याचे व संपूर्ण रकमेचा परतावा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीच्या कायदेविषयक सल्लागारांनी सांगितले.
कंपनीची दोनच कार्यालये सुरू
कंपनीची राज्यात एकूण सात कार्यालये होती. त्यापैकी आता पुणे व सांगली येथील दोनच कार्यालये सुरू आहेत. तक्रारदारांनी सांगितले की, मुख्य कार्यालयही काहीवेळा बंद असते. त्यामुळे संपर्क साधताना अडचणी येत आहेत.