जिल्हा बँकेसाठी वाळवा-शिराळ्यात इच्छुकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:03+5:302021-09-23T04:29:03+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी वाळवा-शिराळा तालुक्यात इच्छुकांची गर्दी झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अधिक चुरस ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी वाळवा-शिराळा तालुक्यात इच्छुकांची गर्दी झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अधिक चुरस आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला आव्हान देण्याची तयारी भाजपसह विरोधी गटातून सुरू आहे.
जिल्हा बॅँकेच्या २१ संचालक पदांसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. वाळवा-शिराळ्याला पाच जागा मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, विद्यमान संचालक आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, नुकतेच राष्ट्रवादीत आलेले दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या यातील कोणीच स्पष्ट सांगत नसल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे भाजपनेही राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासोबत विद्यमान संचालक सी. बी. पाटील, राहुल महाडिक, रणधीर नाईक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. वाळवा तालुक्याला तीन, तर शिराळा तालुक्याला दोन जागा मिळण्याची शक्यता असून, सध्या भाजपकडून तिघे इच्छुक असल्याचे दिसते.
कोट
वाळवा-शिराळ्यात माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीविरोधात जिल्हा बॅँकेच्या रणांगणात उतरणार आहोत.
-सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बॅँक.