आष्ट्यात घोडी, पिसेचा खेळ पाहण्यास भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:17 PM2019-07-01T23:17:07+5:302019-07-01T23:17:43+5:30
आष्टा (ता. वाळवा) येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात रविवारी रात्री घोडीचा खेळ रंगला, तर सोमवारी दिवसभर पिसेचा खेळ झाला. मंगळवारी देवी जोगण्याच्या रूपात
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात रविवारी रात्री घोडीचा खेळ रंगला, तर सोमवारी दिवसभर पिसेचा खेळ झाला. मंगळवारी देवी जोगण्याच्या रूपात दैत्याचा शोध घेणार आहे. हा खेळ पाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे.
उत्सवात देवीने दैत्याचा शोध घेऊन त्याला ठार मारले. दीपपूजन, कंकणविधी, आळुमुळू झाल्यानंतर रविवारी रात्री घोडी हा पारंपरिक खेळ झाला. दैत्याचा शोध घेण्याकरिता कुंभार, सुतार, चांभार, जाधव इतर खेळगडी, मानकरी यांच्यासमवेत दिव्याच्या उजेडात बाहेर पडले. सोंगी भजनामध्ये किंवा कलानृत्य प्रकारातील सजवलेला लाकडी घोडा व पाठीमागे बोराटीचे कृत्रिम शेपूट होते. या वेशभूषेत कुंभारवाडा व सुतार वाड्यातून दोन घोडी बाहेर पडली. मारुती मंदिरापासून या खेळास सुरुवात झाली. घोड्याच्या खेळाच्या पुढे जाधव मानकऱ्यांनी पारंपरिक विनोदी गाणी गायिली. या घोडीच्या शेपटीला बांधलेल्या बोराटीच्या काट्यापासून सर्वजण वाचण्याचा प्रयत्न करीत होते. या घोडीची गावातील थोरात, पाटील, कुलकर्णी, महाजन याठिकाणी पूजा झाल्यानंतर मध्यरात्री हा खेळ संपला.
सोमवारी सकाळी पिसेचा खेळ सुरु झाला. दोन कुंभार, एक गुरव व दोन जाधव अशी पाच पिसे होती. त्यांच्या अंगावर कमरेपर्यंत चोळणा, कमरेला घंटी, एका हातात उंच काठी व दुसºया हातात लिंबाचा झुबका. त्यांच्या तोंडाला काळे फासून हाता-पायावर भस्म व हळदीचे पट्टे ओढून डोक्याला कापसाचे पुंजके लावले होते. मिरज वेसजवळील चौगुले मळ्यात दैत्य रूपातील पिसेला रंगवण्यात आले. सर्व पाच पिसे दिवसभर घरोघरी फिरले.
तोरणाला स्पर्श करीत कर तोडला...
पिसे घराच्या उंबºयावर ठेवलेल्या गूळ पाण्यात हातातील लिंबाचा झुबका बुडवून उंबºयावर आपटला. या पिसेला गूळ-खोबरे व धान्य देण्यात आले. सायंकाळी मिरजवेस येथे उंचावर लिंबाच्या डहाळीचे उंच तोरण बांधले होते. खालील बाजूला अग्नि पेटविण्यात आला. या पाच पिसेनी या अग्नीवरून उडी मारून काठीने लिंबाच्या तोरणाला स्पर्श केला व कर तोडला.