corona virus-गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर 31 मार्च पर्यंत बंदी : डॉ. अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:19 PM2020-03-16T13:19:33+5:302020-03-16T13:26:09+5:30
करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली : करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये मोठ्याप्रमाणात लोकांना समुह जमू न देण्यासाठी संपुर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सभा, मेळावे, सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, धार्मिक, जत्रा, यात्रा, ऊरुस व क्रिडाविषयक इत्यादी कार्यक्रम घेण्यास दिनांक 15 ते 31 मार्च पर्यंत बंदी लागू केली आहे.
धार्मिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु यांना विधिवत पुजा करण्यास तसेच खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास या आदेशाद्वारे बंदी असणार नाही परंतु या दोन्हीबाबत वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी सभा, मेळावे, सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, धार्मिक, जत्रा, यात्रा, ऊरुस व क्रिडाविषयक इत्यादी कार्यक्रम आयोजनासंदर्भात कोणतही परवानगी देऊ नये तसेच यापुर्वी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या रद्द कराव्यात, असे निर्देशित केले आहे.
अशा गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास संबधित संयोजकांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानन्यात येईल व कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
अंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत करोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. तसेच अंतरराष्ट्रीयस्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. असे प्रवाशी सांगली जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.