सांगली शहरात गर्दीमुळे तिसऱ्या लाटेला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:29+5:302021-08-20T04:30:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी महापालिका क्षेत्रात अजूनही चिंताजनक स्थिती आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी महापालिका क्षेत्रात अजूनही चिंताजनक स्थिती आहे. गेल्या दोन लाटांत व्यापारी, नागरिकांनी मोठे नुकसान सहन केले. मात्र त्यापासून कसलाही धडा घेतलेला दिसत नाही. कोरोनाची भीतीच नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येते. रस्त्यावर, बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता तिसऱ्या लाटेला आमंत्रणच दिले जात असल्याचे चित्र आहे.
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा कमी झाली. एप्रिलपासून कोरोना रुग्णांचा आलेख वाढला होता. तब्बल पाच महिने रुग्णसंख्या कमी होत नव्हती. आता कुठे दिलासा मिळतो आहे, असे वाटत असतानाच महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या अजूनही शंभरपेक्षा अधिक आहे. श्रावण महिन्यात सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे.
लाॅकडाऊन शिथील करताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली होती. परंतु, नागरिक कोरोना नसल्याप्रमाणे रस्त्यावर, बाजारपेठेत वावरत आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरील मास्क हनुवटीवर आलेला असतो. सोशल डिस्टन्सिंगचा तर कुठे पत्ताच नसतो. रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढली आहे. दुकानातही क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक असतात. हरभट रोड, मेन रोड, बालाजी चौक, सराफ कट्टा, मारुती रोड या परिसरात अनेकदा वाहनांची कोंडी होत आहे. हीच स्थिती शहरातील अनेक चौकांची आहे. राजवाडा चौक, महापालिका चौक, राम मंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौकातही वाहतूक कोंडी होते. सणाच्या दिवशी तर बाजारपेठेतील दुकानांमध्ये तुडुंब गर्दी असते.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले. तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटांपेक्षाही भयंकर असेल, असे सुतोवाच त्यांनी केले आहे. शहरातील वाढती गर्दी, कोरोना नियमांचे होणारे उल्लंघन, प्रशासनाचा निष्काळजीपणा पाहता तिसऱ्या लाटेला हे आमंत्रण नव्हे काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
चौकट
सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी
महापालिकेकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पण दंडात्मक कारवाई हा त्यावर उपाय नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते.
- राहुल रोकडे, उपायुक्त महापालिका
चौकट
लसीकरणाला गती देण्याची गरज
शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. अजूनही ऑक्सिजन सिलिंडरसाठी दूरध्वनी येत आहे. आता व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. प्रशासनाने लसीकरणाला गती देण्याची गरज आहे.
- सतीश साखळकर, रुग्ण सहाय्य समिती.
चौकट
महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या
दिनांक सांगली मिरज एकूण
१३ ऑगस्ट १२९ २७ १५६
१४ ऑगस्ट ७९ ६ ८५
१५ ऑगस्ट ६५ १६ ८१
१६ ऑगस्ट २९ ११ ४०
१७ ऑगस्ट ५८ ३९ ९७