सांगली शहरात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:47+5:302021-05-05T04:43:47+5:30
सांगली : महापालिकेने बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करताच सांगलीकरांनी मंगळवारी बाजारात तोबा गर्दी केली. किराणा, भाजीपाला, फळे ...
सांगली : महापालिकेने बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करताच सांगलीकरांनी मंगळवारी बाजारात तोबा गर्दी केली. किराणा, भाजीपाला, फळे तसेच बेकरी पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर रांगा लागल्या होत्या. सुरक्षित अंतराच्या नियमांना ठेंगा दाखवित झालेली गर्दी नियंत्रणात आणणे महापालिका व पोलिसांना शक्य झाले नाही.
गेल्या पंधरा दिवसांपासून शासनाचा लॉकडाऊन सुरू होता. त्यात दररोज सकाळी ११ पर्यंत भाजीपाला, किराणा व बेकरी साहित्य विक्रीस मुभा होती. बुधवारी ५ मे पासून महापालिकेने जनता कर्फ्यू जाहीर केल्याने तसेच सकाळी ११ पर्यंत सुरू असलेल्या दुकानांना परवानगी नाकारल्याने मंगळवारी सकाळी सांगलीच्या बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली.
मारुती रोड, हरभट रोड, बालाजी चौक, जुनी भाजी मंडई, गणपती पेठ, वखारभाग, पटेल चौक या परिसरात सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी साडेअकरापर्यंत गर्दी झाली होती. किराणा दुकाने, बेकऱ्यांसमोर रांगा दिसत होत्या. जुनी भाजी मंडई फुल्ल झाली होती. सूरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडाला हाेता. बाजारात अनेकांनी मास्क हनुवटीवर ठेवून खरेदी केली. त्यामुळे कोरोनाला निमंत्रण देणारी ही गर्दी ठरली.
चौकट
पोलीस, अधिकारी हतबल
वाढत असलेली गर्दी पाहून पोलीस व महापालिकेचे अधिकारी बाजरपेठांमध्ये आले. गर्दी इतकी होती की, ती नियंत्रणात आणणे त्यांना अशक्य वाटले. केवळ गर्दीकडे पहात बसण्यापलीकडे त्यांना काही करता आले नाही. पोलिसांनी वाहनाच्या स्पीकरवरून आवाहन करण्याची औपचारिकता पार पाडली.
चौकट
मास्क हनुवटीवर, सुरक्षित अंतर धाब्यावर
बाजारात भाजीपाला खरेदी करताना अनेक नागरिकांनी मास्क हनुवटीवर लावला होता. सुरक्षित अंतर ठेवण्याची परिस्थितीही नव्हती. हीच परिस्थिती धान्य व किराणा मालाच्या दुकानातही दिसून आली.
चाैकट
मार्केट यार्डलाही गर्दी
सांगलीच्या मार्केट यार्डमध्येही मंगळवारी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत धान्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भर उन्हात रांगा लावून नागरिकांनी धान्य खरेदी केले.
चौकट
अकरानंतरही रेलचेल कायम
सकाळी ११ वाजल्यानंतर सर्वत्र पोलिसांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, गर्दी अधिक असल्याने दुकाने बंद होण्यास साडे अकरा वाजले. त्यानंतरही बाजारात वाहनांची व नागरिकांची रेलचेल सुरू होती. काही दुकानांत छुप्या पद्धतीने मालाची विक्री सुरू होती.