सांगलीच्या बाजारपेठेत गर्दीचा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:26+5:302021-04-15T04:26:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर सांगलीच्या मुख्य बाजारपेठेसह मार्केट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर सांगलीच्या मुख्य बाजारपेठेसह मार्केट यार्ड, माॅल्स, भाजी मंडईत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सलग दुसऱ्या दिवशी नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. या वेळी कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. बाजारपेठेत प्रशासनाकडूनही फारशी सक्ती करण्यात आली नव्हती.
गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊनची चर्चा शहरात सुरू होती. गुढीपाडव्याच्या दिवशी लाॅकडाऊनच्या भीतीने बाजारात गर्दी झाली होती. त्यात राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा केली गेली. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीचा पूर आला होता. सकाळी सात वाजल्यापासून नागरिक भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. शिवाजी मंडईत पहाटेपासून विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत मंडईत नागरिकांची गर्दी होती. मारुती रोड, कापडपेठ, हरभट रोडवरील अनेक दुकाने बंद होती. पण, काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू केला होता. त्यातही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. या दुकानांत किरकोळ खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील फळ विक्रेत्यांकडेही नागरिकांची गर्दी दिसत होती.
मार्केट यार्डातील दुकाने संचारबंदीत सुरू राहणार असली तरी नागरिकांनी लाॅकडाऊनची धास्ती घेतल्याचे दिसून येत होते. मार्केट यार्डात किराणा माल खरेदीसाठी अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. तीच स्थिती माॅल्समध्येही होती. बाजारपेठा, मार्केट यार्डात कुठेच कोरोना नियमांचे पालन होत नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. बाजारपेठेत काही ठिकाणी पोलीस तैनात होते. पण, त्यांच्याकडूनही नियमांच्या पालनाचा आग्रह धरला जात नव्हता.
चौकट
नियमांबाबत संभ्रम
शहरात गुरुवारपासून संचारबंदी लागू केली आहे. पण, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेसह किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी फिरून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, संचारबंदी असल्याने घराबाहेर पडता येईल की नाही, या भीतीने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. कोरोना नियमांबाबत नागरिकांत संभ्रम दिसून येत होता.