झेंडूचा दर दोनशे रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:35 PM2017-10-19T23:35:33+5:302017-10-19T23:35:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडूने दोनशे रुपयांचा पल्ला गाठल्याने गुरुवारी उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला. सकाळी शंभर ते सव्वाशे रुपये दर असलेला झेंडू दुपारनंतर चांगलाच वधारला. सायंकाळपर्यंत तर बाजारपेठेतील झेंडूची फुलेच संपली होती.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. दरवर्षी लक्ष्मीपूजनाआधीच सांगलीच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक मोठ्याप्रमाणात झालेली असते. यंदा मात्र बाजारपेठेत झेंडूची आवक कमी होती. बुधवारपासून विक्रेत्यांनी मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ, कॉलेज कॉर्नर, वखारभाग परिसरात झेंडूची विक्री सुरू केली होती, पण विक्रेत्यांकडे थोडाच माल होता.
यंदा पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्याचा परिणाम झेंडूच्या उत्पादनावर झाला आहे. झेंडूची फुले ऐन बहरात आली असतानाच मुसळधार पावसाने झोपडले. त्यामुळे फूलकळी गळून गेली. तसेच बहरलेली फुलेही काळी पडली. त्यात शेतात गुडघाभर पाणी साचून राहिल्याने अनेक उत्पादकांना सणासुदीत झेंडूची तोड करता आली नाही. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूची अपेक्षित आवक होऊ शकली नाही.
गुरुवारी सकाळी सांगलीत झेंडूचा दर १२० ते १५० रुपये किलो होता. दुपारपर्यंत झेंडूच्या दराने २०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. सायंकाळनंतर तर बाजारपेठेत झेंडूच शिल्लक नव्हता.
झेंडूसोबतच नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट, ऊस यालाही मोठी मागणी होती. नारळाच्या झावळ्यांची जोडी ७० ते १५० रुपयांना होती. केळीचे लहान खुंट ५० रुपये जोडी, तर मोठे खुंट ३०० रुपये जोडी दराने विकले जात होते. केळीच्या घडासह खुंट ६०० रुपये जोडी होती. उसाची जोडी ३० रुपये होती. झेंडू, नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट, ऊस खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.