घोटाळेबाजांना सत्ताभ्रष्ट करा
By admin | Published: October 8, 2014 10:37 PM2014-10-08T22:37:17+5:302014-10-08T23:01:32+5:30
स्मृती इराणी : शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळ्यात सभा
कोकरुड : ज्या आघाडी सरकारच्या काळात बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही, महिला असुरक्षित झाल्या, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कोटींचे घोटाळे केले, अशा घोटाळेबाज सरकारला सत्तेवरून कायमचे दूर घालविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले. त्या शिराळा येथे भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.
स्मृती इराणी म्हणाल्या की, केंद्रातील आणि राज्यातील आघाडी सरकारने युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. स्त्री भ्रूणहत्या आणि महिला असुरक्षिततेत महाराष्ट्राने केव्हाच प्रथम क्रमांक पटकावला आहे. आघाडी सरकारचेच हे पाप आहे. राज्यात शेतीला पाणी नाही, शेतीसाठी घेतलेले कर्ज न फेडता आल्याने राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. एवढे करूनही या सरकारने शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना खोटे धनादेश देऊन फसवणूकही केली. जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिलांना मनमोकळेपणाने फिरणे, राहणेही मुश्किल झाले आहे. अजित पवार आणि सुशीलकुमारांसारखे नेते बेताल वक्तव्ये करून चेष्टा करीत आहेत. मात्र ही जनता आघाडी सरकारला कंटाळली आहे.
शिवाजीराव नाईक म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेची निवडणूकही जनतेने हाती घेतली आहे. देशातील आघाडीचे घोटाळेबाज सरकार घालवले आहे. यापुढील काळात महामार्गावरील उड्डाणपूल, वाकुर्डे बुद्रुक योजना यासारख्या योजना मार्गी लावण्याचे काम हाती घेतले असून, शिराळा नागपंचमीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जावडेकर, गडकरींनी दिले आहे. खा. संजय पाटील म्हणाले की, नाईक यांची जिद्द, चिकाटी आणि काम करण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी राजकारण व्यवसाय म्हणून न करता समाजसेवा करण्याचेच काम केले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सौ. अॅड. शुभांगी पाटील, सौ. जयश्री पाटील, कु. प्रियंका माने, प्रकाश पाटील, प्रा. भीमराव गराडे यांची भाषणे झाली.
सौ. सोनाली नायकवडी, सौ. कुंदा पाटील, मकरंद देशपांडे, सौ. सुनंदा नाईक, सौ. राजेश्वरी नाईक, सौ. देवयानी नाईक, सौ. वेदांतिका नाईक, विक्रम पाटील, सुभद्रा आटुगडे, विजयमाला पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्यात महिला असुरक्षित
इराणी म्हणाल्या की, महाराष्ट्र सर्व क्षेत्रात प्रगतीवर असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या आघाडी सरकारच्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात महिलांना मनमोकळेपणाने फिरणे, राहणेही मुश्किल झाले आहे. अजित पवार आणि सुशीलकुमारांसारखे नेते बेताल वक्तव्ये करून चेष्टा करीत आहेत. मात्र ही जनता आघाडी सरकारला कंटाळली आहे, अशीही टीका त्यांनी केली.