कामगारविरोधी धोरण हाणून पाडा
By admin | Published: January 4, 2015 11:47 PM2015-01-04T23:47:35+5:302015-01-05T00:34:38+5:30
यशवंत भोसले : सांगलीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा मेळावा
सांगली : केंद्राने कामगारविरोधी धोरणांचा सपाटा लावला असून, याविरोधात सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन लढा पुकारला पाहिजे अन्यथा कामगार संपुष्टात येईल, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केले.
येथील वेलणकर मंगल कार्यालयात आज सर्व कामगार संघटनांच्यावतीने कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. अजित सूर्यवंशी होते. यावेळी शंकर पुजारी, जे. जे. पाटील, महंमदगौस शरीकमसलत आदी उपस्थित होते. भोसले म्हणाले की, गेल्य अनेक वर्षांच्या लढ्यानंतर कामगार हिताचे निर्णय केंद्राने घेतले; मात्र गेल्या सहा महिन्यांत केंद्र सरकारने हे सर्व कायदे बदलण्याचा घाट घातला आहे. किमान वेतन कायदा, बोनस अॅक्टमध्ये बदल केला जात आहे. कामगारांना चर्चेसाठी बोलावून केवळ फार्स केला जात आहे. केंद्राच्या या धोरणांविरोधात सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. आता कामगार जागा झाला नाही तर, पुन्हा सरकार त्यांना भूतकाळात नेऊन ठेवणार आहे, याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे.
यावेळी अॅड. अजित सूर्यवंशी, शंकर पुजारी, जे. जे. पाटील, सर्जेराव गायकवाड, सुरेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत महंमदगौस शरीकमसलत यांनी केले. प्रकाश माळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
केंद्र शासनाविरोधात आंदोलन
केंद्र शासन कामगारविरोधी धोरण राबवत असून, याच्याविरोधात टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, अशी माहिती यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संपूर्ण राज्यभर मेळावे घेण्यात येत असून, पहिल्यांदा जिल्हास्तरावर आंदोलने करण्यात येतील. त्यानंतर विधिमंडळ, त्यानंतर संसदेसमोर आंदोलने उभारण्यात येतील. प्रथम जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील. यामध्ये सर्व पक्ष, संघटनांचे कामगार प्रतिनिधी सहभागी करुन घेण्यात येणार आहेत. जोपर्यंत कामगारविरोधी धोरणे रद्द केली जाणार नाहीत, तोपर्यंत ही आंदोलने सुरूच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.