कुतूहल माझ्या लिखाणाची प्रेरणा

By admin | Published: November 8, 2015 08:57 PM2015-11-08T20:57:18+5:302015-11-08T23:39:36+5:30

अच्युत गोडबोले : विज्ञान-तंत्रज्ञानाइतकेच साहित्य महत्त्वाचे

Curiosity Inspired by My Writing | कुतूहल माझ्या लिखाणाची प्रेरणा

कुतूहल माझ्या लिखाणाची प्रेरणा

Next

सांगली : वाचनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ‘का’ हा प्रश्न विचारत गेल्याने आणि त्या विषयात कुतूहल निर्माण करीत गेल्यानेच लिखाण करता आले. लिखाणाचा अनुभव नसतानाही साहित्यात वेगळे स्थान निर्माण करु शकलो, याला माझे विषयातील कुतूहलच कारणीभूत असून, विषयांप्रती कुतूहल ही माझी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन नामवंत लेखक अच्युत गोडबोले यांनी रविवारी केले. श्रीकांत अभ्यंकर स्मृती व्याख्यानात ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर गोडबोले बोलत होते.
गोडबोले पुढे म्हणाले, सोलापुरात राहत असताना अनेक महनीय व्यक्ती घरी येत असत. पैशाची नसली तरी, सांस्कृतिक श्रीमंती अधिक असल्यानेच कदाचित लिखाणात ओढला गेलो. बिरजू महाराजांपासून ते भीमसेन जोशींपर्यंत अनेकांचा सहवास लहानपणीच मिळाल्याने नेहमीच संगीत, साहित्य आणि चित्रकलेकडे ओढा होता. मात्र, तरीही गणित विषयातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. दहावीला बोर्डात आल्यानंतर आणि त्यानंतर पवईला आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतरच खऱ्याअर्थाने आपल्यातील मर्यादा कळून आल्या. या मर्यादेतून बाहेर पडण्यासाठी वाचनाकडे ओढा वाढविला. आयआयटीचा विद्यार्थी असलो तरी, आयआयटीचे सोडून सर्व पुस्तके त्यावेळी वाचून झाल्यानेच, प्रत्येक विषयातील ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास सुरुवात झाली.
आपल्या लिखाणाचा प्रवास उलगडताना गोडबोले पुढे म्हणाले, पहिल्यापासूनच कोणत्याही विषयात घुसून त्याचा अभ्यास करण्याची पध्दत आणि वाचन करीत असताना वारंवार पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नाच्या उत्तरातच माझे लिखाण सामावलेले असते. विज्ञान-तंत्रज्ञानाइतकेच संगीत, साहित्य आणि चित्रकला आवश्यक आहे. आजअखेर मी विद्यार्थी या वृत्तीनेच लिहिल्याने अनेक विषय लिहिता आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी गोडबोले यांच्या सहलेखिका दीपा देशमुख यांनीही, लेखन करीत असताना येणारे अनुभव सांगितले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोटणीस महाराज आदी यावेळी उपस्थित होते. मंदार अभ्यंकर व कुटुंबियांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. (प्रतिनिधी)

विषयाच्या प्रेमात पडा...
आजचा विद्यार्थी हा केवळ गुणांच्या मागे धावत असल्यानेच, विषयातील त्याची गोडी कमी होत चालली आहे. फक्त गुण मिळविण्यासाठी अभ्यास करण्याऐवजी, त्या विषयावर प्रेम करीत त्याचा अभ्यास केल्यास लिखाणाची उर्मी निर्माण होत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.

Web Title: Curiosity Inspired by My Writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.