Lok Sabha Election 2019 सांगलीत ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीबाबत उत्सुकता : विशाल पाटील काँग्रेस उमेदवारीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:57 PM2019-03-28T23:57:36+5:302019-03-28T23:58:40+5:30
लोकसभेचा सांगली मतदारसंघ अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाल्याने, उमेदवार कोण असणार? याबाबतची कार्यकर्त्यांमधील उत्सुकता कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दोन दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.
सांगली : लोकसभेचा सांगली मतदारसंघ अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाल्याने, उमेदवार कोण असणार? याबाबतची कार्यकर्त्यांमधील उत्सुकता कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दोन दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते विशाल पाटील अजूनही कॉँग्रेस उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.
सांगलीच्या जागेवरून आघाडीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला किंवा अन्य घटकपक्षाला सांगलीची जागा दिली जाऊ नये म्हणून वसंतदादा गटाने बंडाचे निशाण फडकविले आहे. गटाचा मेळावा घेऊन त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाल्यामुळे विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढणार की अपक्ष म्हणून बंडखोरी करणार, याबाबतची चर्चा आता रंगली आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी जागेचा निर्णय झाल्यानंतर गुरुवारी सर्व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हालचालींना वेग आला आहे. सांगलीत गुरुवारी भाजपचा अर्ज दाखल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येत्या दोन दिवसात उमेदवारी निश्चित करून अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले जात आहे. यामुळे काँग्रेसच्या गटामध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
दादा घराण्यास प्राधान्य
वसंतदादा घराण्याला प्रथम संधी देण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरू आहे. विशाल पाटील यांना उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत विशाल पाटील यांनी त्यांचा निर्णय न दिल्यास राष्टÑवादीचे नेते अरुण लाड किंवा अन्य पर्यायांचा विचार करून शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी जहीर केली जाणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही ही जागा लढविणार आहोत. काँग्रेसमधील इच्छुकांना आम्ही संधी देण्यास तयार आहोत, पण त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवायला हवी. आमचे अन्य दोन सक्षम पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय तातडीने घेणार आहोत.
- खा. राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
काँग्रेस पक्षातर्फेच मला उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे अन्य पक्षांकडून लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाकडूनच असणार आहे. नेत्यांनी आश्वासन दिले आहे.
- विशाल पाटील, नेते, काँग्रेस