उत्सुकता शिगेला, उमेदवारांचे देव पाण्यात!

By Admin | Published: May 13, 2014 11:08 AM2014-05-13T11:08:08+5:302014-05-13T11:10:51+5:30

लोकसभेच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सांगली व हातकणंगले मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Curiously, the Gods of the candidates in the water! | उत्सुकता शिगेला, उमेदवारांचे देव पाण्यात!

उत्सुकता शिगेला, उमेदवारांचे देव पाण्यात!

googlenewsNext

 

 

सांगली : लोकसभेच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सांगली व हातकणंगले मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून आता उमेदवारांनीही देव पाण्यात घातले आहेत. पैजा व सट्टाबाजारही जोरात चालू झाल्याने सर्वांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे. 
अपराजित राहिलेल्या काँग्रेसच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात प्रथमच इतकी चुरस निर्माण झाली आहे. विजयाबाबत कोणालाही ठामपणे दावा करता येऊ नये, इतपत काट्याची लढत या मतदार संघात झाली आहे. त्यामुळे दुतर्फा पैजांना पूर आला आहे. निकालाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवार व त्यांच्या सर्मथकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व भाजपचे संजय पाटील यांच्यातील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून प्रतीक पाटील यांच्यासह वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी जोरदार ताकद लावली आहे. दुसरीकडे संजय पाटील यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांबरोबरच खुद्द पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प्रचारात भाग घेतल्याने, भाजपच्यादृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या दोन्ही उमेदवारांशिवाय आम आदमी पार्टी, जनता दल व काही अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंगत आणली आहे. या सर्व उमेदवारांना किती मते मिळणार आणि त्याचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार, यावरूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. 
येत्या १६ मे रोजी निकाल लागणार असल्याने उमेदवारांनी देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांचे कुटुंबीय व कट्टर सर्मथकांकडूनही नवस बोलले जात आहेत. मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी कुलदैवतासह मोठमोठय़ा देवस्थानांना, तीर्थस्थळांना भेटी देऊन विजयासाठी साकडे घातले होते. प्रचारादरम्यान जशा फेर्‍या झाल्या, तशी देवाकडेही आता दुसरी फेरी काहींनी पूर्ण केली. देवाला साकडे घालताना ज्योतिषांच्या दरबारीही उमेदवार भेटी देत आहेत. एक, दोन नव्हे, तर अनेक ज्योतिषांकडून विजयाची आणि भविष्याची खातरजमा करण्यात उमेदवार गुंग आहेत. 
ग्रहांची स्थिती आणि अंकशास्त्राची जुळवाजुळव करून, आपल्याला विजय कसा मिळू शकतो, याबाबत चौकशा सुरू आहेत. काट्याच्या लढतीमुळे या मतदार संघात मोठय़ा प्रमाणावर पैजा व सट्टा लागला आहे. लाखो रुपयांचा डाव निकालावर खेळला जात आहे. एकूणच निकालापूर्वी राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. (प्रतिनिधी) भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाभर जाळे आहे. मतदानानंतर याच कार्यकर्त्यांमार्फत मतांचा अंदाज उमेदवारांनी घेतला होता. निकाल जवळ आल्याने पुन्हा एकदा आढावा घेण्यात येत आहे. तालुकानिहाय आकडेमोड करून विजयाबाबतची खातरजमा करण्यासाठी खास यंत्रणा कामाला लागली आहे. निकाल जवळ येत असला तरी उमेदवारांचा आढावा सुरूच आहे. पक्षीय स्तरावर अनेक नेत्यांच्या भूमिकेबद्दल शंकाही व्यक्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा नेत्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गावांचा अंदाज अजूनही उमेदवारांना बांधता आलेला नाही. काँग्रेस व भाजपच्या उमेदवारास अशा काही गावांचा अंदाज अजूनही आलेला नाही. सोशल मीडियावर दावे निकाल चार दिवसांवर आल्याने सोशल नेटवर्किंग साईटस्वरून विजयाचे दावे सुरू झाले आहेत. उमेदवारांच्या सर्मथकांनी सोयीचे आकडे व अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही ज्योतिषी व अंकशास्त्र तज्ज्ञांनी ग्रहांची स्थिती व अंकगणिताच्या आधारावर तालुकानिहाय उमेदवारांना मिळणार्‍या मतांचे आकडे टाकले आहेत. त्यांनीही आपल्या भाकिताबाबत दावा केला आहे.

 

Web Title: Curiously, the Gods of the candidates in the water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.